Jackfruit Price Pudhari
पालघर

Jackfruit Price: कर्नाटकी फणसाची विक्रमगड बाजारात दमदार एन्ट्री; गऱ्यांना 120 ते 150 रुपये किलो दर

एप्रिलच्या सुरुवातीलाच फणसाचे गोड व सुगंधी गरे उपलब्ध झाल्याने ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

विक्रमगड: कोकणातील प्रसिद्ध फणस बाजारात दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असतानाच कर्नाटकातून आलेल्या फणसाने विक्रमगडच्या आठवडी बाजारात दमदार एन्ट्री घेतली आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच फणसाचे गोड व सुगंधी गरे उपलब्ध झाल्याने ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

कोकण पट्ट्यात फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असले, तरी सध्या विविध भागांत त्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः कच्च्या फणसापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांमुळे या फळाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. मात्र यंदा बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे आंबा आणि काजूप्रमाणेच फणस उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी कोकणातील फणस मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला बाजारात येतो. त्यामुळे सध्या बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कर्नाटकी फणस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल झाला आहे. विक्रमगडच्या आठवडी बाजारात सध्या पाच ते सहा हातगाड्यांवर फणसाचे गरे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, त्यांच्या गोड सुगंधाने संपूर्ण बाजारपेठ भारून गेली आहे.

सध्या फणसाचे गरे 120 ते 150 रुपये प्रति किलो दराने विकले जात असून, एक पूर्ण फणस 300 ते 350 रुपयांपर्यंत विकला जात आहे. हंगामाच्या सुरुवातीमुळे दर जास्त असले तरी ग्राहकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. उन्हाळ्यात थंडावा देणारे आणि गोड चवीमुळे आवडणारे फणस खरेदीसाठी नागरिकांमध्ये अक्षरशः झुंबड उडताना दिसत आहे.

काही ग्राहकांच्या मते, कर्नाटकी फणसाची चव कोकणातील फणसाइतकी गोड व स्वादिष्ट नसली तरी सध्या उपलब्धतेमुळे पर्याय म्हणून त्यालाच पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे वटपौर्णिमेसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर फणसाच्या गऱ्यांना मागणी असते. त्यामुळे एप्रिल महिन्यातच वाढलेली आवक विक्रेत्यांसाठी फायद्याची ठरत आहे.

काही शेतकरीही फणस उत्पादनाकडे वळत आहेत. एका झाडापासून मोठे उत्पादन मिळत असल्याने या पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र गावठी फणस बाजारात उशिरा येत असल्याने कर्नाटकी फणसालाच मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT