SBI Jawhar Branch Issue Pudhari
पालघर

SBI Jawhar Branch Issue: एआय, फायबरच्या जमान्यातही जव्हार स्टेट बँक ‌‘ऑफलाईन‌’; खातेदार सकाळपासून रांगेत

दिवसभर व्यवहार शून्य; संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

जव्हार: जव्हार तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या एकमेव शाखेत शुक्रवारी (दि. 5 जून) ग्राहकांचा संताप अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‌‘नेटवर्क नाही‌’ या कारणावरून तासन्तास व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने दूरवरच्या आदिवासी पाड्यांतून आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या उध्दट वागणुकीमुळे आणि सुरक्षा रक्षकामार्फत ग्राहकांना बाहेर काढल्याच्या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.

जव्हारसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यात भारतीय स्टेट बँकेची ही एकमेव शाखा असल्याने शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक विविध आर्थिक व्यवहारांसाठी याच बँकेवर अवलंबून आहेत. मात्र ग्राहकांना आवश्यक माहिती देण्याऐवजी एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर पाठवले जात असल्याची तक्रार अनेकांनी केली.

बचत खाते, मुदत ठेव (एफडी) किंवा इतर सेवांसाठी विचारणा करणाऱ्या ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी पावसाळ्यापूर्वी शेतीची कामे, बी-बियाण्यांची खरेदी आणि अन्य गरजांसाठी पैसे काढण्यासाठी अनेक आदिवासी बांधव सकाळपासूनच बँकेत दाखल झाले होते.

मात्र कर्मचाऱ्यांनी नेटवर्क बंद आहे, असे सांगत व्यवहार होत नसल्याचे स्पष्ट केले. दुपारचे दोन वाजून गेले तरी कामकाज सुरू न झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.दरम्यान, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांशी बँक कर्मचाऱ्यांनी सन्मानाने वागावे, ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करावे आणि बँकेचे कामकाज सुरळीत ठेवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

पैसे काढायला आले, निराश होऊन परत गेले

नेटवर्क नसल्याचे कारण देत दिवसभर व्यवहार बंद राहिल्याने अनेक शेतकरी व आदिवासी बांधवांना बी-बियाणे खरेदी, शेतीची तयारी आणि घरगुती गरजांसाठीचे पैसे काढता आले नाहीत. परिणामी अनेकांना कोणतेही काम न होता परतावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT