विक्रमगडचे नगराध्यक्ष नीलेश पडवळे अटकेत  File Photo
पालघर

Deposit forgery case Jawhar : विक्रमगडचे नगराध्यक्ष नीलेश पडवळे अटकेत

111 कोटींचा निधी अपहार प्रकरण: तपासात अनेक बडे अधिकारी सापडणार

पुढारी वृत्तसेवा

पालघर/जव्हार : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वर्षानुवर्षीची ठेकेदारांची जमा अनामत रक्कम हडपण्यासाठी खोटा चेक आणि बनावट सह्यांच्या मदतीने तब्बल 111 कोटी 63 लाखांचा निधी हडपण्याचा डाव एसबीआय शाखा जव्हारच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमुळे उधळला.

याबाबत शुक्रवारी रात्री साबां विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन यांनी जवाहर पोलिसात याबाबतची फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष आणि ओवी कंट्रक्शनचे मालक नीलेश उर्फ पिंका पडवळे यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून बँकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा सुद्धा या या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपी जव्हार कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जव्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सां.बां.विभागाचा चेक क्रमांक-069218 हा आमच्या चालू खाते असलेला चेक बुक नसून, सदर चेकवर असलेली सही मी अथवा आमच्या कार्यालयाच्या अकाउंटंट यांनी केलेली नसल्याबाबत अकाउंटंट यांनी मला लेखी कळविले आहे.

तसेच चेक वरील हस्ताक्षर व दिनांक हे मी सार्वजनिक बांधकाम अधिकारी व अकाउंटंट यांनी दिलेले नाही,सदर चेक बुक हे आमच्या कार्यालयाच्या वरिष्ठ अर्थ लिपिक अजिंक्य पाटील यांच्या ताब्यात असतो, त्यामुळे सदर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जव्हार येथे देण्यात आलेला एकशे अकरा कोटी 63,लाख 31 हजार 810 रुपये इतक्या रकमेचा देण्यात आलेला चेक ओवी कंट्रक्शन यांना डिमांड ड्राफ्टद्वारे रक्कम अदा करणे बाबत 07/11/2025 अशी तारीख असलेला चेक हा आमचे सां.बा.विभाग कार्यालयामार्फत माझे व आमचे अकाउंटंटच्या साक्षरीत गेलेला नसून माझी व आमचे कार्यालयाचा अकाउंटंट यांचे अपरोक्ष खोटे सही व हस्ताक्षर लिखित बँकेकडे चेक क्र. 069218 हा डिमांड ड्राफ्टसाठी यज्ञेश अंभीरे हा बँकेत घेऊन जाऊन तो घेऊन गेलेला चेक न वठल्याने त्याच्या चौकशीसाठी ओवी कंट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे व इतर दोन इसम असे बँकेत आले, असल्याचे बँक मॅनेजर यांनी सांगितले. त्यामुळे त्या दोघांवर गुन्हा दाखल झाल करून अटक केली आहे.

मुळात हा डी.डी काढताना वापरण्यात आलेले शिक्के,चेक तसेच जव्हार बांधकाम विभाग कार्यालय भागातील सर्व संशयास्पद हालचाली बघता यामध्ये बांधकाम विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर यातील प्रमुख आरोपी पडवळे यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येतीलच मात्र 2020/22पासून अशा प्रकरणांची जर चौकशी केली तर असे अनेक प्रकार यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकारानंतर आता जव्हार बांधकाम विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा होण्याची शक्यता आहे.

त्या बँक कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून जाहीर सत्कार

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांकडून जेव्हा हा 111 कोटींचा बोगस चेक जव्हार एसबीआय बँकेच्या शाखेत पाठवण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मुख्य प्रबंधक संजय कुजूर आणि राहुल सोनवणे क्लार्क यांना संशय आल्याने त्यांनी याबाबतची चौकशी केली आणि हे प्रकरण समोर आले यामुळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुनील भुसारा यांनी शाखेत जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि अभिनंदन देखील केले. यावेळी माजी आमदार भुसारे यांनी या सर्व प्रकारांना मागचा आका कोण? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

आरोपी पिंका पडवळे नेमका कोण आहे?

जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठे नाव आणि शिवसेनेचे उपनेते जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचे ते सख्खे मेव्हणे असून विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष देखील आहेत तर त्यांची ओवी कंट्रक्शन नावाची कंपनी असून या भागातील ते मोठे ठेकेदार म्हणून गणले जातात तर सध्याच्या सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचार बॅनर वर देखील त्यांचे फोटो दिसून येतात. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हा पैसा शिवसेनेच्या उमेदवारांसाठी निवडणुकीत वापरला जाणार असल्याचा आरोप देखील केला आहे. तर या मागे मुख्य आता कोण याचा सुद्धा शोधणे गरजेचे असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

चेक बँकेत घेऊन जाणारा आरोपी यज्ञेश अंभीरे कोण?

111 कोटी हडपण्याच्या या प्रकरणात दुसरा आरोपी असलेला यज्ञेश अंभिरे कोण याची देखील चर्चा जव्हार परिसरात होत आहे. या फिर्यादीमध्ये यज्ञेश अंभिरे याने जव्हार बांधकाम विभागातून चेक एसबीआय मध्ये नेल्याचा उल्लेख आहे तर आरोपीमध्ये सुद्धा याचा समावेश आहे यज्ञेश आंबिरे हा जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाला कर्मचारी नसल्याचे आता समोर येत असून तात्पुरत्या स्वरूपात कॅशियरच्या सोबतीला काम करण्यासाठी त्याला अनधिकृत रित्या ठेवल्याचे देखील आता समजून येत असून या अंभिरे याचा पगार देखील आरोपी पिंका पडवळे हाच देत असल्याचे आता काही ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.

विद्यमान लोकप्रतिनिधींचे कानावर हात?

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील 111 कोटी हडप करण्याच्या या प्रकरणात माजी आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेत हे प्रकरण चांगलेच गाजवले तर यातील आक्का कोण याचा शोध घेण्याचा सुद्धा त्यांनी मागणी केली असली तरी या भागातील विद्यमान लोकप्रतिनिधी खासदार हेमंत सवरा,आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मात्र या एवढ्या मोठ्या प्रकरणावर कसलीही प्रतिक्रिया न दिल्याने जनतेमध्ये कमालीची नाराजी आहे. कारण की हा पैसा गोरगरीब ठेकेदारांचा नंतर मात्र सर्वसामान्यांच्या कष्टातून टॅक्स मधून शासनाकडे जमा झालेला हा पैसा होता या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता दाखवून यामध्ये खरंतर पुढाकार घेणे गरजेचे असताना सुद्धा विद्यमान लोकप्रतिनिधीनी चुप्पी साधल्याने आता त्यांच्या या भूमिके बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT