पालघर : हनिफ शेख
आज पालघर जिल्हा चौथी मुंबई होण्याच्या मार्गावर आहे मुख्यमंत्र्यांपासून पालक मंत्र्यांपर्यंत प्रत्येक जण विविध कार्यक्रम पत्रकार परिषद यामधून पालघर ही चौथी मुंबई कशी होणार आहे याचे दिवा स्वप्न दाखवत आहेत. यामध्ये सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर हा प्रकल्प असेल मुरब्बे कोर्ट असेल मुंबई-वडोदरा मार्ग असेल याशिवाय राज्यातील पहिलाच बुलेट ट्रेन सुद्धा याच भागातून जात आहे आणि नुकतेच पालघर जिल्ह्यातील वाढवण किंवा वसई या भागात विमानतळ होणार अशी घोषणा देखील सरकारच्या मंत्र्यांकडून करण्यात आली आहे.
यामुळे हे जे काही प्रकल्प ज्या भागात होणार आहेत ते पालघर जिल्ह्यातील नागरी आणि सागरी भाग असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ही प्रस्तावित नवी मुंबई याच भागात बनणार असेल तर मग आजही कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू आणि अनेक मूलभूत गरजांसाठी झटणाऱ्या जव्हार मोखाड्यातील नागरिकांचा किंवा या तालुक्यांचे तुमच्या चौथ्या मुंबईत आमचे स्थान काय असा सवाल आता येथील नागरिक विचारू लागले आहेत.
यामुळे मुळात कोणताही विकास हा सर्वांकष आणि सर्वांना घेऊन होणारा असावा नाहीतर पुन्हा एकदा गरीब श्रीमंती जशी दरी वाढत जाते तशी विकास आणि भकास असे दोन चित्र एकाच जिल्ह्यात निर्माण होण्याची भीती यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे ज्या प्रकारे या मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कोट्यवधी रुपयांचा निधी देते त्याचप्रमाणे जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील आरोग्य यंत्रणा आणि तेथील मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील भरीव निधी आणि युद्ध पातळीवर काम होणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन 2014 साली पालघर हा नवीन आदिवासी जिल्हा निर्माण झाला. यामुळे प्रशासकीय व्यवस्था आणि विकास नदी हा थेट गावाच्या वेशीपर्यंत लोकांच्या दारात पोहोचेल अशी अपेक्षा होती, मात्र ती आजची स्थिती पाहता फोल ठरली असल्याचे दिसून येत आहे. या नवीन पालघर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर सध्या मोठमोठे प्रकल्प उभासरत आहेत. यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून वाढवण बंदर याकडे बघितले जाते.
जगातील दहाव्या क्रमांकाचे बंदर असल्याचे देखील अनेकदा जाहीर भाषणातून लोकप्रतिनिधींकडून सांगितले जाते. तर बुलेट ट्रेन सुद्धा याच भागातून जाणार आहे. सध्या मुंबई-बडोदरा जो महामार्ग आहे त्याचेही काम पूर्णत्वास असून तो देखील याच पालघर मुख्यालयाच्या आणि वसई-विरार या शहरी भागातूनच जातो. याशिवाय बुलेट ट्रेन ही सुद्धा याच भागातून धावणार आहे आणि या प्रकल्पांच्या नंतर या भागात विमानतळ देखील होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
हे विमानतळ वाढवण-डहाणू भागात होणार की वसई-विरार भागात होणार यावरून सध्या मतांतरे देखील निर्माण झालेली आहेत. याच प्रकल्प आणि विमानतळ यांच्या भरोशावर पालघर चौथी मुंबई होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र याच पालघर जिल्ह्यातील तलासरी मोखाडा जव्हार विक्रमगड हे संपूर्ण आदिवासी तालुके आजही विकासापासून कोसो दूर आहेत.
या तालुक्यातील परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणा आजही सक्षम नाही. शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी चालविले जात आहेत. यामध्ये मोखाडासारख्या रुग्णालयात आजही कायमस्वरूपी डॉक्टरांची वाणवा आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने मरणाऱ्या मातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय कुपोषण, बालमृत्यू तर पाचवीलाच पुजल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रस्ते अभावी डोली करून रुग्ण नेण्याच्या घटना ताज्या आहेत. तर केवळ रुग्णवाहिका न मिळाल्याने एका मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बसमधून तब्बल सत्तर किलोमीटर प्रवास करणारी एक घटना आजही ताजी आहे.