पालघर : राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या कार्यप्रदर्शनाचे सर्वांगीण मूल्यमापन नुकतेच 1 जानेवारी रोजी पार पडले. या राज्यस्तरीय गुणांकनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे मूल्यमापन आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, राज्यातील एकूण 30 प्रकल्प कार्यालयांचा त्यामध्ये समावेश होता.
या मूल्यमापनात आस्थापना विषयक बाबी, विविध योजनांची अंमलबजावणी व माहिती व्यवस्थापन, अर्थ व लेखा परीक्षण, डिजिटल पोर्टलचा प्रभावी वापर, बांधकाम विषयक कामकाज, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था, बैठकींचे नियोजन व अंमलबजावणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम या महत्त्वाच्या घटकांचा सखोल विचार करण्यात आला. या सर्वच निकषांमध्ये जव्हार प्रकल्प कार्यालयाने उत्कृष्ट नियोजन, पारदर्शक कार्यपद्धती व प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर, आर्थिक शिस्त तसेच योजनांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी यामुळे कार्यालयाची कामगिरी इतर प्रकल्प कार्यालयांसाठी आदर्श ठरली आहे.
येथील प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर यांच्या नेतृत्वामुळे कार्यालयीन कामकाजात शिस्त व कार्यक्षमतेला चालना मिळून आदिवासी विकासाच्या विविध उपक्रमांना नवी दिशा मिळाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही आदिवासी विकासाच्या कार्यात अशीच उत्कृष्ट कामगिरी कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नसून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित, समन्वयपूर्ण व कर्तव्यनिष्ठ कामगिरीचे फलित आहे. प्रकल्प अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळेच हे घवघवीत यश साध्य होऊ शकले.डॉ. अपूर्वा बासुर, (भा.प्र.से)