Palghar Crime pudhari photo
पालघर

Palghar Crime : मित्रांच्या किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू

जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जव्हार : दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दुर्दैवी मृत्यूत झाले. मित्राने मारलेल्या जोरदार ठोशामुळे गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर दत्तात्रय गायकवाड (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी निलेश अमृत गभाले (वय ३५) याच्याविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जव्हार येथील गोरवाडी परिसरात हेमंत वाघ यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर निलेश गभाले आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. ज्ञानेश्वर गायकवाड हे मोखाडा येथे पोलीस खात्यात कार्यरत होते, तर निलेश गभाले हा ठाणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त निलेश जव्हार येथे आला होता, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी निलेशने ज्ञानेश्वर यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे त्यांचे नाक फुटले आणि ते खाली कोसळले. पडताना त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर दुखापत झाली. नाकातून व डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रात्री जव्हार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ज्ञानेश्वर यांची प्रकृती सुधारत नसल्याने पुढील उपचारासाठी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांना घोटी येथील एस.एम.डी.टी. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच ११ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, या घटनेप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा जव्हार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी निलेश गभाले याला १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्यायालय, भिवंडी येथे हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या घटनेचा पुढील तपास जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार करीत आहेत. किरकोळ वादातून मित्राचा जीव गेल्याने गोरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका क्षणाच्या रागाने दोन मित्रांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT