Janjire Arnala Fort 
पालघर

Janjire Arnala Fort | समुद्रावर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष; वसईतील अजिंक्य 'जंजिरे अर्नाळा' किल्ल्याचा प्रदीर्घ इतिहास!

Janjire Arnala Fort | छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करताना 'ज्याचे जलदुर्ग, त्याचे समुद्र' हा महान मंत्र दिला.

पुढारी वृत्तसेवा

केळवा रोड : विजय घरत
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करताना 'ज्याचे जलदुर्ग, त्याचे समुद्र' हा महान मंत्र दिला. महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि पद्मदुर्ग यांसारख्या बलाढ्य जलदुर्गांची निर्मिती करून मराठ्यांचे आरमार मजबूत केले.

शिवछत्रपतींचा हाच जलदुर्गांचा वारसा आणि समुद्रावरील वर्चस्व मिळवण्याचे धोरण पुढे पेशव्यांनी ताकदीने चालवले. याच शिवशाहीच्या प्रेरणेतून आणि मराठ्यांच्या पराक्रमातून आकाराला आलेला एक अद्वितीय आणि अजिंक्य जलदुर्ग म्हणजेच अर्नाळा किल्ला.


पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात, वैतरणा नदी आणि समुद्राच्या संगमावर वसलेला हा किल्ला मराठ्यांच्या आरमाराच्या आणि शौर्याच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देत आजही खंबीरपणे उभा आहे. इ.स. १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने वैतरणेच्या मुखावर राजकीय व व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या बेटावर प्राथमिक स्वरूपाचे बांधकाम केले. इ.स. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा ताबा मिळवून येथे आपल्या सैन्याची चौकी उभारली आणि तटबंदी केली.

इ.स. १७३७ मध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसईच्या मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांचा पराभव करून अर्नाळा किल्ला मराठ्यांच्या छत्रछायेखाली आणला. बाजीरावांच्या आज्ञेवरून शंकरजी केशव यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी व मक्कम तटबंदी केली. ब्रिटिश काळात इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अर्नाळा हा किल्ला आयताकृती (चौकोनी) असून सुमारे ४ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. किल्ल्याभोवती ३० ते ४० फूट उंचीची भक्कम व अखंड तटबंदी आहे. तटबंदीचे रक्षण करण्यासाठी ९ मजबूत बुरुज उभारण्यात आले आहेत. यामध्ये भैरव, भवानी आणि बाबा बुरुज प्रमुख आहेत.

गडाल सुरक्षितेचे कवच देणारे तीन मुख्य दरवाजे आहेत. उत्तराभिमुख असलेले मुख्य महाद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले दोन उत्तुंग, अवाढव्य बुरुज पाहताच क्षणी गडाच्या पराक्रमाची जाणीव करून देतात. दरवाजाच्या चौकटीवर सिंह आणि हत्तीची डौलदार व जिवंत शिल्पे कोरलेली असून, त्याच्यावर असलेला ऐतिहासिक शिलालेख गडाच्या प्रदीर्घ इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून आजही दिमाखात उभा आहे.

त्यात 'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पश्चात्यासि वधुनि सिंधू उदरी बांधा त्वरे जंजिरा!!', असे कोरलेले आहे. या शिलालेखावरून श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आज्ञेने शंकरजी केशव यांनी या जलदुर्गाचे पुनरुज्जीवन केले हे सिद्ध होते.

किल्ल्याच्या समोर उभे राहताच डाव्या बाजूस अथांग समुद्राच्या छाताडावर खंबीरपणे पाय रोवून उभा असलेला 'हनुमंत बुरुज' नजरेत भरतो. गडाच्या पोटाशी त्र्यंबकेश्वर, कुलस्वामिनी भवानी माता आणि महादेवाच्या पवित्र मंदिरांचे अधिस्थान आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात दगडी पायऱ्यांनी सजलेले अतिशय देखणे, अष्टकोनी तळे तत्कालीन शिल्पकलेची साक्ष देते, तर गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात बाहेर कालिकामातेचे शक्तीपीठ/मंदिर वसलेले आहे.

मराठ्यांच्या आरमाराचा अजिंक्य इतिहास!

  • छत्रपतींचा जलदुर्ग मंत्र: 'ज्याचे जलदुर्ग, त्याचे समुद्र' हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र पुढे पेशव्यांनी ताकदीने चालवून समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

  • ऐतिहासिक स्थित्यंतर: १५१६ मध्ये सुलतान महमूद बेगडा, १५३० मध्ये पोर्तुगीज, १७३७ मध्ये मराठे (चिमाजी आप्पा व बाजीराव पेशवे) आणि १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात असा या गडाचा प्रदीर्घ इतिहास आहे.

  • वास्तुकला आणि मंदिरे: ४ हेक्टरवर पसरलेली ३०-४० फूट उंच तटबंदी, ९ भक्कम बुरुज, हत्ती-सिंहाची शिल्पे असलेला मुख्य दरवाजा, अष्टकोनी तळे आणि त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिकामाता व महादेवाची मंदिरे हे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT