बोईसर : औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारी रासायनिक राख थेट शेतजमिनीवर टाकली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची तसेच शेतीची सुपीकता नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीलगत मौजे पामटेंभी येथील सर्वे क्रमांक 15/9 मधील 33 भागीदारांच्या सामाईक शेतजमिनीवर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक राख टाकली जात असल्याची बाब माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अशोक वडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीत बजरंग इंटरप्रायजेस या कंपनीच्या माध्यमातून संबंधित रासायनिक राख शेतजमिनीवर टाकली जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आलेल्या संमतीपत्रानुसार बाष्पीभवन यंत्रातून निर्माण होणारी राख ही विटभट्टी व्यावसायिकांना देणे अपेक्षित आहे. मात्र, ही राख खुल्या जागेत टाकली जात असल्याने ती वाऱ्याबरोबर हवेत पसरून जवळील वस्तीपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांना श्वसनविकारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.