नैसर्गिक नाल्यावर पुलाचे अनधिकृत बांधकाम सुरू? pudhari photo
पालघर

Illegal bridge construction : नैसर्गिक नाल्यावर पुलाचे अनधिकृत बांधकाम सुरू?

महसूल आणि महापालिका प्रशासन गाफिल!

पुढारी वृत्तसेवा

वसई : वसई पश्चिम येथील कृष्णा टाऊनशीप येथे नैसर्गिक नाल्यावर महसूल विभागाच्या जागेत पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम कोण करीत आहे? मात्र बांधकामाच्या परवानगीबाबत माहिती देणारा आणि दर्शनी भागात अपेक्षित असलेला फलक अथवा बोर्ड येथे लावण्यात न आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, यामुळे हे बांधकाम अवैध असल्याची शंका पर्यावरणवादी कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी उपस्थित करून, प्रभाग समिती एच मधील सहाय्यक आयुक्त हरेश्वर पाटील यांना भेटून निवेदन सादर केले आहे.

नाल्यावर भराव करून अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळ्यात सतत वसई बुडत आहे. हा पूर्वानुभव असतांना, महसूल आणि महापालिका प्रशासन गाफिल कसे? असा प्रश्न डाबरे यांनी उपस्थित केला आहे. सदर ठिकाणी माझ्याच निवेदन व पाठपुराव्या नंतर वसई महसूल विभागाने जुलै 2025 रोजी 99000 ब्रास इतका अनधिकृत माती भराव बाबत नोटीस काढली होती. परंतु सदर भराव सुरूच आहे.

त्यात आता अगदी नैसर्गिक नाल्यावर पुलाचे अनधिकृत बांधकाम होत आहे. वसईत मागील 10 वर्षापासून सातत्याने बुडत आहे. पूर परिस्थिती दरवर्षी भयानक बनत आहे अशावेळी नैसर्गिक नाल्यावर अनधिकृत बांधकामे, भराव यामुळेच वसई कायमची बुडविण्याचे नियोजन पालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप डाबरे यांनी केला आहे.

ही बाब आयुक्त, वसई विरार आणि तहसीलदार, वसई यांना अवगत करून दिली आहे. महसूल विभागाच्या जागेवरील व नैसर्गिक नाल्यावरील बांधकाम तत्काळ बंद करण्याचे आदेश निघतात की अश्या बांधकामांना प्रोत्साहन दिले जाणार? याबाबत वसईकराना लवकरच समजेल, असेही डाबरे म्हणाले. सहाय्यक आयुक्त हरेश्वर पाटील यांना याबाबत विचारले असता, हे क्षेत्र आणि काम प्रभाग समिती इ कार्यक्षेत्रातील आहे. आपण विभागीय कनिष्ठ अभियंत्यास चौकशी करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT