House collapsed in rain pudhari photo
पालघर

Palghar News : घरकुलासाठी जातीचा दाखला ? दाखल्यासाठी मोडली मुलीची नथ

तीन वर्षांपासून घराची प्रतीक्षा ...अखेर उभ्या पावसात घर कोसळले; कविता घाटाळ या विधवेचे­­­­ घर कसे उभे राहणार?

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

कुटुंबाचा आधार गमावला, कित्येक वर्षापासून येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करीत ती लढली, मुलं मोठी केली, आज मुलगा आठवीला आणि मुलगी सातवीला आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. पतीच्या निधनानंतर तिने संसार उभा केला. मात्र घर उभी करू शकली नाही यासाठी तिने शासकीय इमारतींच्या पायऱ्या झिजवल्या.

सुरुवातीला घरकुल हवे असेल तर त्यासाठी कागद जमा व्हावी लागतात सर्वात महत्त्वाचा जातीचा दाखला लागतो आणि जातीचा दाखला काढायला मोठ्या प्रमाणावर शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात यासाठी पैसे आणायचे कुठून. पण डोक्यावर हक्काचं छत मिळेल म्हणून या आशेने तीन आपल्या लहान मुलीची नथ मोडली आणि त्या पैशातून जातीचा दाखला काढून सगळी कागद जमवली आणि ती साहेबांकडे दिली. मात्र गेल्या तीन वर्षापासून तिला घरकुल मिळाले नाही.

घरकुलाची वाट बघत असतानाच या पावसात तिचं पूर्ण छप्पर जागच्या जागी कोसळलं नशीब बलवत्तर घटना दुपारी घडली आणि ती नेमकी कामानिमित्त बाहेर होती ही भयावह परिस्थिती आहे मोखाडा तालुक्यातील खोच या गावातील कविता घाटाळ या विधवेची....!

गेल्या काही दिवसात मोखाडा तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले असल्यामुळे अनेक कच्ची घरे पडल्याचे दिसून आले, यात कविता घाटाळ हीचे देखील घर कोसळल्याची माहिती मिळाली. यावेळी अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तिला मदतही केली. तालुक्यात अशा दोन-चार घटना घडल्या मात्र कविता या विधवा महिलेचे पडलेले घर ही फक्त एक घटना नव्हती तर ही एक कहाणी होती तिच्या संघर्षाची आणि सरकारी अनास्थेची.... कारण की एकही कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही अशी घोषणाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे,

अशावेळी एक घरकुल मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याची प्रचिती या घटनेमधून येते. घरात कर्ता पुरुष कोणीच नाही. जवळ दोन लहान मुले त्यांना सांभाळायचं की कामाला जायचं हा प्रश्न कविताला सतावत होता याचवेळी स्वतः जगायचं मुलांना जगवायचं की घर बांधायचं या असंख्य प्रश्नांचे काहूर तिच्या मनात होतच मात्र आपण करीत असलेल्या कष्टामध्ये फक्त उपजीविका भागू शकते यामुळे तिने कसाबसा आपला संसारात चालविला.

मात्र सरकार प्रत्येकाला घरकुल देत त्यात कविताही विधवा, त्यामुळे तिला प्राधान्याने सर्वांच्या अगोदर घरकुल मिळायला हवं अशी अपेक्षा होती मात्र आज तीन वर्षे झाले तरी तिला हक्काचं घरकुल मिळालं नाही मात्र या घरकुलासाठी कागदपत्र जमवताना तिला मुलीची नाकातील नथ तोडावी लागली हे कोणत्या विकासाचे द्योतक आहे याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे. चार वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर एखाद वर्षानंतर कविताने मला हक्काचं घरकुल मिळेल का? हा प्रश्न घेऊन सरकार दरबारी फेऱ्या मारायला सुरुवात केली.

यावेळी यासाठी लागणार्या दाखल्यासाठीचा प्रवास सुरू झाल्यानंतर कार्यालयीन खर्च आणि भाडापोळा यासाठी पैशांची गरज होती असं कविता सांगते. यासाठी तिने चक्क मुलीची नाकातील नथ तोडून हा खर्च भागवला आणि जातीचा दाखला मिळवला. या दाखल्याबरोबरच विविध कागदपत्र जोडून सरकारी दरबारी घरकुलासाठीचा अर्ज तिचा पडला. मात्र तो तीन वर्षानंतरही पुढे सरकलाच नाही का असा प्रश्न समोर येत आहे.

भर पावसात एका विधवेला घरापासून वंचित राहावे लागत आहे. एका शेजारील घरात तिने सध्या आसरा घेतला आहे. मात्र शासनाची प्रत्येकाला घर देणारी योजना नेमकी कुठे आहे हा खरा प्रश्न आहे. "या बाबत तत्कालीन ग्रामसेवक यांस विचारले असता त्यांचा शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज पाठवला आहे. मात्र दोन वर्षापासून शबरी घरकुल योजनेचा लक्षांक आलेला नसल्याचे सांगितले. तसेच त्यांचे नाव ड यादीत असून तसे प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.

कागदपत्रांसाठी होते दमछाक

आज शासनाच्या कोणत्याही योजनांसाठी मोठ्या प्रमाणांत कागदपत्रांची आवश्यकता असते. यामुळे सर्व कागदपत्र जमवताना सर्व सामान्यांची मोठी दमछाक होत होत असते. याचाच फायदा काही दलाल लोक घेऊन अमुक योजना मिळवन देतो असे सांगत अनेकदा या योजनांसाठी सर्वसामान्यांना मोठा खर्च देखील करावा लागतो याशिवाय सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. योजना देताना लाभार्थीच्या दारात योजना देण्याचा दावा करणारी यंत्रणा अशावेळी नेमकी कुठे जात हा खरा सवाल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT