Gokhivare Bhoyadapada Dumping Ground  Pudhari
पालघर

Vasai Virar Waste | कचऱ्याच्या डोंगराने वसई-विरारकरांचा श्वास कोंडला : वर्षभरापासून जैव-मिथेन प्रकल्प बंद

गोखिवरे-भोयदापाडा डम्पिंग ग्राउंडची समस्या गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Gokhivare Bhoyadapada Dumping Ground

विरार : वसई-विरार शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गोखिवरे-भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीव्र दुर्गंधी, धुराचे लोट आणि पावसाळ्यात कचऱ्यातून वाहून येणारे दूषित पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी १ हजार ते १ हजार २०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. मात्र, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा जैव-मिथेन प्रकल्प मागील सुमारे वर्षभरापासून बंद असल्याने डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा भार वाढत आहे. येथे आधीच सुमारे १५ लाख मेट्रिक टन कचरा साचला आहे. मागील दोन वर्षांत सुमारे ५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असली, तरी नव्याने जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील ढिगारे कमी होण्याऐवजी वाढत आहेत.

गोखिवरे-भोयदापाडा परिसरात कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमुळे धुराचे लोट पसरतात. पावसाळ्यात कचऱ्यातून झिरपणारे दूषित पाणी परिसरात वाहून येत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेत भर पडते. त्यामुळे नागरिकांना खिडक्या-दारे बंद ठेवण्याची वेळ येत असल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, नालासोपारा शहरातील विविध भागांमध्ये तसेच प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी कचरा जाळला जात असल्याने हवेच्या गुणवत्तेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. बांधकाम आणि अनधिकृत इमारती पाडल्यानंतर निर्माण होणाऱ्या मलब्याच्या विल्हेवाटीचाही प्रश्न गंभीर आहे.

महापालिकेकडून बंद जैव-मिथेन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून प्रश्न सुटणार नाही. ओला-सुका कचरा स्रोतावरच वेगळा करणे, बांधकाम मलब्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, मोठ्या कचरा उत्पादकांवर कारवाई आणि उघड्यावर कचरा टाकण्यास आळा घालणे आवश्यक आहे.

वसई-विरारचा वाढता विस्तार लक्षात घेता कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने ठोस कृती आराखडा राबविला नाही, तर गोखिवरे-भोयदापाड्यातील कचऱ्याचे डोंगर भविष्यात शहरासाठी गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक संकट ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT