पालघर : हनीफ शेख
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी आदिवासी उपयोजना मधील केलेल्या कामांची ठेकेदारांची देणी बाकी असल्याच्या मुद्द्यावर पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपलब्ध निधीतून ते पैसे तात्काळ देऊन टाकण्याच्या सूचना केल्या. तसेच यावेळी अनेक काम निकृष्ट दर्जाची झालेली असून आजही पालघर ते जव्हार जाण्यासाठी रस्ते अतिशय नादुरुस्त असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
तर यावेळी नाईक यांनी सांगितले की ठेकेदाराच्या मेहरबानी वर कारभार चालणार नाही आणि यापुढे उधारीत काम न करता जेवढा निधी शिल्लक असेल तेवढेच टेंडर काढण्याच्या सप्त सूचना देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला केले आहेत. तर ही नियोजन समितीची बैठक सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र मुंबई -अहमदाबाद वाहतूक कोंडीचा फटका पालकमंत्री नाईक यांना बसताना दिसला.सदरची मीटिंग तब्बल अडीच तास उशिराने चालू झाल्याने नाईक यांनी हा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला आणि यावर प्रदीर्घ चर्चा देखील करण्यात आली.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग,मीरा-भाईंदर सीपी तसेच पालघर पोलीस अधीक्षक अशा सर्व विभागांशी बोलून त्यावर तात्काळ तोडगा याच बैठकीत काढल्याचे देखील दिसून आले. यावेळी नाईक यांनी पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा पुनरुचार करत विविध योजनांच्या अंमलबजावणी बाबत चर्चा केली. तसेच या भागातील उपस्थित आमदारांनी देखील आपापल्या विभागातील अनेक अडचणी या बैठकीत मांडल्या. या प्रत्येक अडचणींचा या बैठकीमध्ये उहापोह करताना तो सोडविण्याचा प्रयत्न नाईक यांनी केल्याचे देखील यावेळी दिसून आले.
यावेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी अनेक पाड्यांना वीज नसल्याचा उल्लेख केला तर खरीवली कंचाळ चापके तलावली या ठिकाणी अनेक अनधिकृत दगड खाण असून या वाहतुकीचा त्रास देखील स्थानिकांना होत असल्याने याबाबतची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. तर पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील स्मशानभूमी यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा ग्रामीण रुग्णालय येथील समस्यांचा पाढा वाचला याला उत्तर देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड यांनी या रुग्णालयासाठी जागा निश्चित करीत असून लवकरच 100 खाटांचे रुग्णालय होणारा असल्याचे उत्तर दिले.
यावेळी पालकमंत्री नाईक यांनी पुन्हा एकदा भ्रष्ट अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणाचा दाखला देत जर दहा टक्के अधिकारी वाईट असतील तर 12 टक्के राजकारणी नाकर्ते असल्याचा उल्लेख त्यांनी या बैठकीत केला. तर वसईचे आमदार स्नेहा दुबे यांनी वसई विरार भागात क्रीडा संकुल व्हावे याविषयी मागणी केली तर जिल्हा परिषदेतील शाळा मनपाकडे वर्ग केल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केले.
आमदार विनोद निकोले जि.प बांधकाम विभागावर नाराज
पालकमंत्री नाईक यांनी सर्व आमदारांना विषय मांडण्याची संधी देत सर्व विभागातील समस्या ऐकून घेतल्या यावेळी डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली. निकोल यांनी सांगितले की माझ्या मतदारसंघातील कोसबाड वरई पाडा या भागातील रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून नादुरुस्त आहे हा पत्रव्यवहार करून करण्याच्या सूचना करूनही जि. प बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही मात्र चिखला या ठिकाणचा रस्ता मंजूर केल्याचा आरोप देखील निकल यांनी यावेळी केला याला उत्तर देताना कार्यकारी अभियंता जागृती संख्ये यांनी या कामाची मागणी झाली असल्याचे सांगितले यावर नुसती मागणी नाही तर पाठपुरावा करा अशा सूचना यावेळी केल्या.
निधी वाटपावरून आमदार नाराज असल्याची चर्चा
यावेळी या बैठकीस नाईक हे उशिराने आले मात्र तोपर्यंत आमदार विनोद निकोले आमदार दौलत दरोडा आमदार शांताराम मोरे आमदार हरिश्चंद्र भोये आदी आमदार निधी वाटपावरून नाराज असल्याची चर्चा पसरली होती यामुळे हे आमदार या बैठकीवरच बहिष्कार टाकतील असं एक प्रकारची बातमी पसरली होती मात्र नाईक यांनी आल्यानंतर नियोजन समितीच्या बैठकीच्या अगोदर या आमदारांची एका बंद दरवाजा आड चर्चा केल्याचे सांगण्यात येत असून यातून यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे सुद्धा आता सांगण्यात येत आहे यामुळे हे चारही आमदार बैठकीला उपस्थित दिसून आले.