राज्य सरकारने तिसर्‍या मुंबई पाठोपाठ चौथ्या मुंबईची घोषणा केली असून ही चौथी मुंबई महाराष्ट्रातील नवे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. Pudhari News Network
पालघर

Fourth Mumbai : चौथ्या मुंबईमुळे पालघरला वेगळे वैभव प्राप्त होणार

रोजगार निर्मितीसाठी चौथी मुंबई ठरणार आश्वासक; वाढवण बंदरामुळे मिळणार जागतिक ओळख

पुढारी वृत्तसेवा

पालघर : निखिल मेस्त्री

राज्य सरकारने तिसर्‍या मुंबई पाठोपाठ चौथ्या मुंबईची घोषणा केली असून ही चौथी मुंबई महाराष्ट्रातील नवे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात तयार करण्याचा आराखडा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत तयार केला जात असून तिसर्‍या मुंबईच्या मानाने ही मुंबई दळणवळणाच्या व विकासात्मक दृष्टीने सक्षम असणार आहे.

केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी बंदर प्रकल्प वाढवण अर्थात हरित वाढवण बंदर प्रकल्प पालघरच्या डहाणू तालुक्यात उभारला जाणार आहे. जगातील दहा बंदरांच्या यादीत हे बंदर समाविष्ट होणार आहे. वाढवण बंदराचे काम पूर्ण होता होता, याच परिसरात विमानतळ, अद्ययावत रस्ते, समृद्धी जोडमार्ग, मुंबई-वडोदरा महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली समर्पित रेल्वे मालवाहतूक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, कोकण महामार्ग अशी दळणवळणाची सुविधायुक्त व सक्षम साधने पालघर जिल्ह्यात उभी राहणार आहेत.

त्यामुळे हे बंदर चौथ्या मुंबईशी संलग्न व वाढवण परिसरात उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसित करण्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईला चांगला पर्याय ठरणार आहे. तिसर्‍या मुंबईच्या मानाने वाढवणभोवती उभारण्यात येणारी चौथी मुंबई ही सर्वंकष विकासाच्या दृष्टीने उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरामुळे या नवीन शहरामध्ये विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून त्या दृष्टीने एका नव्या शहराचा विकास वाढवण बंदराभोवती शक्य आहे. राज्य सरकारने यापूर्वी वाढवण विकास केंद्र क्षेत्र जाहीर केले होते. सुरुवातीच्या काळामध्ये या विकास केंद्रामध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. आता 11 ऐवजी 96 गावांचा समावेश चौथ्या मुंबईत करण्यात आला आहे. ही गावे मिळून चौथ्या मुंबईचे क्षेत्र थेट 512 चौरस किलोमीटर इतके असणार आहे.

त्यामुळे बंदर विकासक्षेत्र असलेल्या आजूबाजूच्या परिसरात औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकासाच्या विपुल संधी उपलब्ध होणार आहेत. चौथी मुंबई उभारत असताना नियोजनबद्ध विकास केला जाणार आहे. वाढवण हे विकासकेंद्राचे केंद्रबिंदू असल्यामुळे या केंद्राचे नियोजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे. चौथ्या मुंबईसह या परिसरात औद्योगिक क्षेत्र, कंटेनर ठेवण्यासाठी गोदामे, लॉजिस्टिक हब, रस्ते, वाहतूक - निवासी - वाणिज्यक व व्यापारी वसाहती, शाळा महाविद्यालय, रुग्णालय उभी राहणार आहेत. या क्षेत्रासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ प्राधिकरण म्हणून नेमण्यात येणार असून त्या अंतर्गत विकास योजनेसह आराखडा तयार केला जात आहे. चौथ्या मुंबईमुळे पालघर आणि लगतच्या भागाला एक वेगळे वैभव प्राप्त होणार असून हा भाग नव्या ओळखीने महाराष्ट्राच्या नकाशावर आपले नाव उमटवणार आहे. वाढवण येथे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ भराव टाकून केले जाणार आहे. यासह पालघरला जोडण्यासाठी व वाहतूक अधिक जलद गतीने होण्यासाठी वर्सोवा, विरार, पालघर सिलिंग बांधण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई ते विरार हा 43 किलोमीटरचा मार्ग अर्थात सेतू उभारला जाणार आहे. सहा पदरी असलेला हा सेतू मार्ग पुढे थेट पालघरला जोडला जाणार आहे. त्यातच मेट्रो-13ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मीरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारला जाणार आहे. वसई खाडीवर दुमजली पूल बांधून त्यावरून मेट्रो व वाहनांची वाहतूक होणार आहे. त्यामुळे हे रस्ते मार्ग थेट पालघरच्या चौथ्या मुंबईला जोडून विकासाच्या अपार संधी प्राप्त करून देणार आहेत. जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्प असून विरार आणि बोईसर ही स्थानके आहेत. त्यामुळे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प चौथ्या मुंबईसाठी दळणवळणाच्या दृष्टीने पूरक ठरणार आहेत. पालघर जिल्हा हा मुंबईला जवळ असला तरी विकासाच्या दृष्टीने अविकसित राहिला होता. मात्र, आता वाढवण बंदराच्या निमित्ताने राज्य सरकारने चौथ्या मुंबईच्या माध्यमातून पालघरचा विकास करण्याचे नियोजन केले आहे. चौथ्या मुंबईच्या निमित्ताने विकासाच्या दृष्टीने दर्जेदार नवनवीन विकासाचे प्रकल्प पालघरमध्ये येणार आहेत. विकास झपाट्याने होणार असल्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारासह स्थानिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

चौथी मुंबई पालघरमधील 107 गावांमध्ये

मुंबई महानगर प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारण्यात येणार असून या अंतर्गत ही चौथी मुंबई समाविष्ट केली जाणार आहे. नीती आयोगाने मुंबई महानगरला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष ठेवले असून त्या अंतर्गत महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब उभारली जाणार आहेत. वाढवण हे त्या अंतर्गत एक क्षेत्र आहे. वाढवण बंदराच्या परिघांमध्ये येत असलेल्या 107 गावांमधील 512 चौरस किलोमीटरच्या परिसरात ही चौथी मुंबई विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून रस्ते विकास महामंडळामार्फत तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ही मुंबई गुजरात सीमेच्या महाराष्ट्रातील तलासरीपर्यंत विस्तारली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT