वाडा : वाडा तालुक्यातील सापने बु. फाट्याच्या समोर जंगलात चार गाईंची हत्या करून मांस चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आल्याने अज्ञात आरोपी मांस व गाईंचे अवशेष सोडून फरार झाले आहेत. वाडा पोलिस घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली असून गाईंची हत्या करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
सापने बु. फाटा येथे महामार्गाच्या कडेला नजिकच्या कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाला गाईची शिर व मांस असल्याचे लक्षात आले. स्थानिक तरुणाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिल्याने पालघर जिल्हा संयोजक शुभम पष्टे व त्याचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.
चार गाईंची कत्तल करून त्याच ठिकाणी मांस वेगळे करून लंपास करण्याचा हा प्रकार तरुणांच्या लक्षात आला. पोलिसांना याबाबत माहिती देताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कार्यवाही सुरू केली आहे. चार गाईंची मुंडकी, उघडे मांस व प्लास्टिक पिशवीत भरलेले मांस घटनास्थळी आढळले आहे.
कारची सीट याठिकाणी पडलेली असून हत्यारे देखील याच ठिकाणी असल्याने तस्करांनी गाडीत भरून हे मांस विक्रीसाठी नेले जात असल्याचा अंदाज आहे. दरम्यान गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही असे निंदनीय प्रकार घडत असल्याचे सांगत कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल तरुणांनी उपस्थित केला आहे. बंजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या प्रकारची निंदा करून कडक कारवाईची मागणी केली आहे.