वसई : ख्रिस्ती धर्माचे भारतीयकरण करण्यात मोलाचे योगदान असलेले प्रख्यात वसईकर ख्रिस्ती धर्मगुरू हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धपकाळाने निधन झाले होते. आज वसईच्या रमेदी चर्च येथे तीन बिशपांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता फादर फर्नांडिस यांच्यासाठी विशेष प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अकरा वाजता फादर हिलरी यांनी, स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांच्या पार्थिवाचे ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन न करता पाचुंबंर येथील हिंदू स्मशानभूमीत दहन करण्यात आले. फादर हिलरी यांच्या पश्चात ज्येष्ठ बंधू रॉबर्ट फर्नांडिस, पुतण्या फादर कॅलिस्टस फर्नांडिस व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
आज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत फादर हिलरी यांचे पार्थिव वसई पश्चिमेच्या त्यांच्या तरखड येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पार्थिव रमेदी चर्च येथे आणण्यात आले. मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, काश्मीरचे वसईकर बिशप आयवन परेरा, फादर जोएल डिकुना व फादर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष प्रार्थनासभा यावेळी घेण्यात येऊन, फादर हिलरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, नगरसेवक लॉरेल डायस, जनआंदोलन समितीच्या नेत्या डॉमनिका डाबरे, कॅथोलिक सभेचे अध्यक्ष थॉमस नुनीस आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर 11 वाजता मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पाचुंदर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले.
सर्वधर्मसमभाव आणि भारतीयकरणाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ख्याती होती. फादर हिलरी फर्नांडिस हे वास्तववादी होते. पण त्यांनी केलेल्या लेखन आणि भाषणातून ते नास्तिक असतील असं अनेकांना वाटायचं. पण नंतर त्या अस्तिकासारखी येशूची उपासना देखील करायचे. मराठी ख्रिस्ती धर्मात क्रांती घडवून आणणारे फादर म्हणून हिलरी फर्नांडिस सर्वधर्मीय वसईकरांच्या कायम लक्षात राहतील, अशी प्रतिक्रिया माजी महापौर, तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.