No Ambulance Service in Mokhada Dead Infant in Bag
मोखाडा : मोखाडा तालुक्यात बालमृत्यूचे तांडव काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यात एका अर्भकाचा मृत्यू झाला आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानेच आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र याही पेक्षा भयाण म्हणजे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय मोखाडा आणि तिथून नाशिक जिल्हा रुग्णालय, असा प्रवास करूनही हे बाळ वाचले नाहीच. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाला वडिलांनी चक्क पिशवीत घालून ८० किमीचा प्रवास केल्याने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील जोगलवाडी येथील गर्भवती महिला अविता सखाराम कवर (वय 26) हिला रात्री 3 वाजेच्या सुमारास पोटात कळा येवू लागल्या. 108 या क्रमांवावर फोन लावून संपर्क करण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पुन्हा सकाळी 8 वाजता रुग्णवाहिकेसाठी संपर्क करण्यात आला. मात्र, दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्णवाहिकेची वाट पाहून सुध्दा रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर एका खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे उपचार शक्य नसल्याने तिला मोखाडा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यास सांगितले.
मात्र, रूग्णालयात रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे उपकेंद्रातून रूग्णवाहिका मागविण्यात आली. संध्याकाळी 6 वाजता गर्भवती महिलेला मोखाडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. घर ते ग्रामीण रुग्णालय पोहचण्यासाठी त्या मातेला १५ तास लागले. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पोहचल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.
नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया करत मातेला वाचविण्यात यश आले. मात्र, यानंतर मृत अर्भक होते. त्याला घरापर्यंत पोहचवणे किंवा त्याची पुढील योग्य ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असताना त्या मृत अर्भकास थेट पालकांच्या ताब्यात दिले. रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनासाठी पैसे नसल्याने सखाराम कवर या पालकाने चक्क मृत अर्भकास पिशवीत भरून तब्बल 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास बसने केला. आणि मूळ गावी येऊन अर्भकावर अंत्यसंस्कार केले.
एकीकडे जिल्ह्यात वाढवण बंदर, बुलेट ट्रेन सारखे मोठे प्रकल्प येत असताना एका मातेला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. तसेच मृत अर्भक पिशवीत घालून पालकाला बसने प्रवास करावा लागत असल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे.
लवकर रुग्णवाहिक न मिळाल्याने पालक सखाराम कवर याने तेथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना जाब विचाराला असता आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. यावेळी एक गर्भवती माता रुग्णवाहिका मिळविण्यासाठी ९ तास प्रतीक्षा करते. तेव्हा त्या पालकाला राग येणे साहजिक आहे. मात्र, अशाही स्थितीत त्या पालकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्या पालकांनी केला आहे. यामुळे एकीकडे बालकाला गमावल, बायको जीवाशी वाचली आणि पोलिसांचा मारही भेटला, अशा विदारक स्थितीत हे कुटुंब आहे.
सदरची गर्भवती महिला कमी महिन्यांची होती. मात्र, आमच्या आरोग्य अधिकारी यांनी तपासले असता बालकाचे ठोके दाखवत नव्हते. त्यामुळे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले होते.- डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी