राजकुमार भगत
उरण : करंजा-रेवस पुलाच्या बांधकामासाठी ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी सध्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून या उत्खननामुळे परिसरातील आदिवासी समाजात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे याच मार्गावर करंजा आदिवासी वाडी असून गेली दीडशे वर्षे येथे आदिवासी समाज वास्तव्यास आहे. पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या या वाडीत शेकडो आदिवासी कुटुंबे आजही आपल्या घरांत वास्तव्य करत आहेत. मात्र या आदिवासी नागरिकांना विश्वासात न घेता, कोणतीही पूर्वसूचना, चर्चा अथवा सामाजिक सुनावणी न करता थेट उत्खनन सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आदिवासींचा आरोप आहे, की हा विकास त्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरत असून भविष्यात त्यांना जबरदस्तीने विस्थापित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘पूल उभारणीच्या नावाखाली आमच्या डोक्यावर घरं राहतील की नाही, याचीही खात्री राहिलेली नाही,’ अशी भावना स्थानिक आदिवासींमधून व्यक्त होत आहे.
या उत्खननामुळे डोंगर उतारावर असलेल्या आदिवासी घरांना तडे जाण्याचा धोका निर्माण झाला असून जोरदार उत्खनन सुरू राहिल्यास भूस्खलन होण्याची आणि त्यातून थेट जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आदिवासींच्या मते, त्यांच्या घरांजवळ स्फोटक यंत्रणा, अवजड यंत्रसामग्री आणि खोल उत्खनन सुरू असल्याने लहान मुले, महिला आणि वृद्ध यांचे प्राण धोक्यात आले आहेत. द्रोणागिरी पर्वत हा केवळ भौगोलिक भाग नसून पौराणिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे. अशा संवेदनशील ठिकाणी पर्यावरणीय अभ्यास, सामाजिक परिणाम अहवाल आणि आदिवासींची लेखी संमती न घेता काम सुरू करणे म्हणजे नियमांची थेट पायमल्ली असल्याचा आरोप होत आहे.