Electricity problem is complicated in Vikramgarh
विक्रमगड : पुढारी वृत्तसेवा
विक्रमगड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु झाल्याने नागरिकांना मोठा मनः स्ताप सहन करावा लागत आहे. मे महिन्यात अवकाळी पावसासह वादळी वारा झाल्याने अनेक ठिकाणचे विद्युत खांब, विद्युत वाहिन्या कोसळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याकडे लोकप्रतिनिधी यांनी प्राधान्याने लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विक्रमगड परिसरात अनेक ठिकाणी दहा मिनिटे देखील वीज टिकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने येथील व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. यामुळे महावितरणाच्या विरोधात वीज ग्राहकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात असून नागरिकांमधुन तिखट प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. सद्यस्थितीत महिनाभरापासुन दहा- दहा मिनिट वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. त्यातच अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली वीज बंद ठेवली जाते. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
महावितरणे पावसाळा पूर्व कामे जोरात सुरु असल्याचा दावा जरी केला असला तरीही अनेक ठिकाणी कामे रेंगाळल्याचे चित्र आहे. त्यामुळेच वारंवार विज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडुन बोलले जात आहे. त्यात नेहमी विराज लाईन ब्रेक झाली असल्याचे कारण अनेकदा पुढे केले जाते. त्यामुळे पर्यायी पूर्वीची पालघर लाईन चालु करावी व त्यास जोडणी करावी अशी मागणी विद्युत ग्राहकांमधून केली जात आहे.
सोसायट्याचा वारा सुटल्यानंतर तात्काळ विजपुरवठा सुरेक्षेचा उपाय म्हणुन अगर पोल पडल्याने, झाडे विद्युत वाहिनीवर पडल्याने खंडित होत असतो. अधुन मधुन नेहमीच विज जात असल्याने शासकीय कार्यालय, बँक सेवा, टपाल सेवा, महा ई सेवा, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे. सोबतच अनेक व्यवसायीकांचे नुकसान होत आहे.
तालुक्यात १२ वर्षांपासून विजेची समस्या निर्माण आहे. यावर कायमस्वरुपी उपाय आवश्यक आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यवसायीकांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणाने विजेची समस्या तत्काळ सोडवावी.अरुण धुम, माजी सरपंच, वसुरी (विक्रमगड)
काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात महावितरणचे मोठ्या प्रमाणात विद्युत खांब आणि वाहिन्या कोसळून पडल्या होत्या. आम्ही प्राधान्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ८ टीम माध्यमातून काम करत होतो. आता विद्युत खांब, वाहिन्यांचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असुन विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल. त्यामुळे विद्युत समस्या सुटेल.सुनील भारांबे, कार्यकारी अभियंता, महावितरण पालघर