वाडा : वाडा ते भिवंडी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या विद्युत वाहक खांबांना बाजूला करण्याचे काम महावितरण कडून सुरू होते. कंत्राटदाराकडून मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने वडवली गावाजवळ यातील आठ ते दहा खांब तारांसह कोसळून पडल्याची घटना बुधवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गासह परिसरात वावरणाऱ्या लोकांच्या जीवाला मात्र धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वाडा तालुक्यात मोठे औद्योगिक क्षेत्र असून कारखान्यांना विद्युत पुरवठा करण्याच्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या महामार्गाच्या कडेला नेण्यात आल्या आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले असताना रस्त्याच्या आड येणाऱ्या विद्युत खांबांना बाजूला घेण्याचे काम महावितरण कडून सुरू होते.
बुधवारी वाडा परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला असून मुसळधार पावसामुळे आधीच कुचकामी पद्धतीने उभारलेले विद्युत खांब अचानक कोसळून पडले. उच्च दाबाच्या अवजड वाहिन्या वाहून नेणारे खांब खरेतर मजबूत पुरलेले हवे होते मात्र कंत्राटदाराने थातूरमातूर काम केल्याने आठ ते दहा खांब एका बाजूने कलंडून मोठी दुर्घटना घडली.
वडवली गावाच्या शुभेच्छा कमानीसह काही वाहनांवर या तारा कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक सांगत असून सुदैवाने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला खांब कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कोट्यावधींचा खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या वाहिन्या जर इतक्या निकृष्ट दर्जाच्या असतील तर भविष्यात ही मोठी धोक्याची घंटा आहे असे सांगत या प्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.