Dombivli Mahashivratri Pudhari
पालघर

Dombivli Mahashivratri: डोंबिवलीत बर्फातून साकारणार पाच दिव्य शिवलिंग प्रतिकृती

हर हर महादेवाच्या घोषात महाशिवरात्री पर्वणी!

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहर : संस्कृती शेलार

मुंबई-पुणे ए“हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण डोंबिवली नगरी महाशिवरात्रीच्या भक्तिरंगात न्हाऊन निघणार आहे. रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त ‌‘सांस्कृतिक नगरी‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत विशेष तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध मंदिरांमध्ये दिवसभर पूजा-अर्चा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ‌‘ॐ नमः शिवाय‌’च्या मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमून जाणार आहे.

यंदा महाशिवरात्रीनिमित्त डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान येथे भक्तांसाठी भव्य आणि आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे बर्फापासून साकारलेली पाच दिव्य शिवलिंगांची आकर्षक आणि देखणी प्रतिकृती. या अद्वितीय रचनांचे दर्शन सायंकाळी 5.30 ते मध्यरात्रीपर्यंत भाविकांना घेता येणार आहे. हे दर्शन केवळ देखाव्यापुरते मर्यादित नसून, भक्तीभाव जागवणारा आणि शिवतत्त्वाशी एकरूप करणारा आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित देखावे साकारले जातात. गतवर्षी कैलास पर्वताची प्रतिकृती उभारण्यात आली होती, तर त्याआधी कडधान्यांपासून शिवप्रतिमा आणि 12 ज्योतिर्लिंगांची भव्य रचना साकारण्यात आली होती. या परंपरेचा यंदाही भव्य आविष्कार पाहायला मिळणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक यांनी दिली.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 6 वाजता आणि मध्यरात्री 12 वाजता विशेष पूजा-अर्चा होणार आहे. यामधील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी ‌‘निशिथकाल पूजा‌’ मध्यरात्रीच्या अत्यंत पवित्र काळात केली जाते. यंदा निशिथकाल रात्री 12.28 ते 1.18 या वेळेत असल्याने भाविकांना विशेष संधी लाभणार आहे. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी रात्री 1.30 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिवसभर विविध स्तोत्रपठण, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण होते. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा दिव्य अनुभव घेण्याची पर्वणी डोंबिवलीकरांना यंदाही लाभणार आहे. “हर हर महादेव”च्या घोषात यंदाची महाशिवरात्री डोंबिवलीत दैदीप्यमान ठरणार आहे.

निशिथकाल पूजेची आध्यात्मिक महती

निशिथकाल पूजा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्रीच्या पवित्र काळात केली जाणारी विशेष शिवपूजा. पौराणिक कथेनुसार, एक शिकारी जंगलात अडकला होता. तो झाडावर बसून रात्रभर जागा राहिला. नकळत त्याच्या हातून खाली असलेल्या शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी पडत राहिले. त्याने त्या दिवशी उपवासही केला होता. निशिथकाल पूजेला भाविक या पूजेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, अशी माहिती अध्यक्षा अलका मुतालिक यांनी दिली.

महाशिवरात्रीनिमित्त गणेश मंदिरात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित शिवप्रतिमा साकारली जाते. तसेच महाशिवरात्री निमित्त दिवसभर पूजा-अर्चा, स्तोत्रपठण आणि भक्तिमय कार्यक्रम सुरू असतात. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री केली जाणारी. निशिथकाल पूजा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. यादिवशी मध्यरात्रीनंतर मंदिराचा गाभारा पूर्ण भरलेला असतो आणि ती पूजा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडते.
अलका मुतालिक, अध्यक्षा, गणेश मंदिर संस्थान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT