हनिफ शेख
पालघर: पालघर जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला नाशिक-त्र्यंबकेश्वर-जव्हार-पालघर महामार्ग सध्या प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरला आहे. मोखाडा ते त्र्यंबकेश्वर दरम्यानचा २५ ते २८ किलोमीटरचा रस्ता आणि त्यातील तोरंगण घाट सध्या 'मृत्यूचा घाट' म्हणून कुप्रसिद्ध होत आहे.
तारापूर-बोईसर अणुऊर्जा प्रकल्प, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि २०२७ मधील त्र्यंबकेश्वर कुंभमेळा या पार्श्वभूमीवर या मार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता वर्ग होऊनही या धोकादायक घाटाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
अपघातांचे मुख्य कारण आणि नेटवर्कची अडचण : तीव्र उतार आणि वळण : त्र्यंबकेश्वरकडून मोखाड्याकडे येताना पालघर हद्दीत सलग ६ ते ७ किमी तीव्र उतारावरून खाली येत असताना चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि लोडिंग वाहनांचे ब्रेक फेल होऊन अपघात होतात.
मदतीला उशीर : अपघाती ठिकाण मुख्य शहरांपासून १२ ते १५ किमी दूर आहे. घाटात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे रात्री-अपरात्री अपघात झाल्यास संपर्क करणे कठीण होते. तसेच अपघातग्रस्त वाहनांची लूटमार व दगडफेकीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांची कल्पकता ठरली 'देवदूत' आणि भविष्यातील मागण्या
मातीचे ढिगारे ठरले रक्षक : महामार्ग विभागाचे दुर्लक्ष असताना, मोखाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन एपीआय प्रदीप गीते यांनी कल्पकता दाखवून वळणावर मातीचे मोठे ढिगारे टाकले. यामुळे ब्रेक फेल झालेली वाहने दरीत न कोसळता या ढिगाऱ्यांमुळे रस्त्यावरच अडकून अनेकांचे प्राण वाचले.
पोलिस चौकी व रुग्णवाहिकेची मागणी : या भागात तातडीने मदत मिळण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस चौकी, रुग्णवाहिका आणि मोठ्या घाटांच्या धर्तीवर 'रनवे ट्रॅक लेन' निर्माण करावी, अशी मागणी मोखाडावासीय करत आहेत.
चौपदरीकरणाचे आव्हान : २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी रस्ता मोजणी सुरू असली, तरी एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या असल्याने घाटातील २५ किमी रस्त्याचे रुंदीकरण करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
घाटातील अपघातांची धक्कादायक आकडेवारी
एका मृत्यूवरही ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) म्हणून सुधारणा होणे गरजेचे असताना, येथे गेल्या ५ वर्षांत १५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
२०२१ : २ मृत्यू
२०२२ : ३ मृत्यू
२०२३ : ३ मृत्यू
२०२४ : ३ मृत्यू
२०२५ : ४ मृत्यू
एकूण : ५ वर्षांत १५ मृत्यू
(२०१७ मध्ये या घाटात झालेल्या एका भीषण अपघातात तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर काही महिन्यांपूर्वीच ४० प्रवाशांचा आयशर ट्रक अपघात थोडक्यात टळला आहे.)