डहाणूच्या ग्रामीण भागात नादुरुस्त एसटी बसेसमुळे प्रवासी हैराण pudhari photo
पालघर

Dahanu ST bus problem : डहाणूच्या ग्रामीण भागात नादुरुस्त एसटी बसेसमुळे प्रवासी हैराण

बस रस्त्यातच होतात बिघाडग्रस्त, प्रवाशांना ताटकळत करावी लागते प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : डहाणू तालुक्यातील ग्रामीण व डोंगरी भागात एस.टी. बससेवेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. डहाणू-सायवन-किरमीरा या मार्गावर बस बंद पडणे तसेच चालक आजारी पडण्याच्या घटना घडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे डहाणू बस आगारातून जुन्या व बिघाडग्रस्त बस ग्रामीण भागात पाठविल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत असून, त्यामुळे रस्त्यातच बस बंद पडण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी सकाळी 6.15 वाजताची बस किरमीरा परिसरात सुमारे 65 प्रवासी असताना अचानक बंद पडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त झाला. याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, चालक आजारी पडल्यामुळे पर्यायी चालक येईपर्यंत बस थांबवावी लागल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत वाट पहावी लागली.

दरम्यान, डहाणू बस डेपोतून यात्रेसाठी व्हाया महालक्ष्मी मार्गे किरमीरा धावणारी हीच बस दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास बापुगाव येथे पुन्हा बंद पडली. किरमीरा, दाभाडी, सुकटआंबा, चळणी, सायवन आदी गावांतील प्रवासी या बसने प्रवास करत असताना ही घटना घडली. तिकीट काढूनही प्रवाशांना दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.वारंवार होणाऱ्या या बिघाडाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे.

सोनोग्राफीसाठी गेलेल्या एका गर्भवती महिलेला घरी परतण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काही अंतर पायी जावे लागले, तर काही विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट पाहावी लागली. दरम्यान, बस पंचर झाल्यानंतर स्टेपनी बदलण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध असूनही ते नादुरुस्त असल्याने बसची तात्काळ दुरुस्ती करता आली नाही.

परिणामी, प्रवाशांची अडचण अधिकच वाढली. ग्रामीण भागात पर्यायी वाहन व्यवस्था वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत थांबावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या प्रकारांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, बसमध्ये बसल्यानंतरही वेळेत प्रवास पूर्ण होईल की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करण्यासाठी एस.टी. महामंडळाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी आता प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

या मार्गावर बस बंद पडल्यास पर्यायी वाहन येईपर्यंत वाट पाहावी लागते. लांबचा प्रवास असल्याने अतिरिक्त भाडे परवडत नाही. गैरसोय होत असूनही थांबण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे बिघाडग्रस्त बस रस्त्यावर पाठवू नयेत, अन्यथा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
प्रविण गावित, प्रवासी, किरमिरा
बसचा बिघाड झाल्यानंतर तात्काळ पर्यायी वाहन पाठविण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली.
महेश भोये, व्यवस्थापक, डहाणू आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT