Dahanu Mahalaxmi Yatra 2026 Pudhari
पालघर

Dahanu Mahalaxmi Yatra 2026: डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेस आजपासून प्रारंभ

ठाणे,पालघरसह राज्यभरातून भाविकांची होतेय गर्दी ,पालघर जिल्ह्यातील मोठी यात्रा

पुढारी वृत्तसेवा

निलेश कासट

कासा: पालघर जिल्ह्यातील डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रोत्सवास गुरुवार पासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा असून ठाणे,पालघरसह राज्यातील विविध भागातून देवीच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येत असतात.

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. सुरत मधील भाविकांचीही या देवीवर विशेष श्रद्धा आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांना सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र, यात्रा आदी निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते हे येथील मुख्य आकर्षण असून यात्रेत ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून लाखो भाविक येतात पालघर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा आहे.

या यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला होम व त्यानंतर अष्टमीला दुसरा होम असतो. देवीवर आदिवासी समाजाची मोठी श्रद्धा असून आदिवासी समाजा बरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती आदी समाजाचे भाविक देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. मंदिरात पुजारी हे आदिवासी समाजाचे असून ते श्रद्धेने देवीची पूजा करतात. महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका आहेत.

या यात्रेला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा लगत विवळवेढे गावात मातेचे मंदिर असल्याने मुंबई हुन गुजरात तसेच गुजरात हुन मुंबईकडे जाणारे भावीक मातेच्या दर्शनाला येतात. भाविकांना येथे येण्यासाठी अनेक वाहने उपलब्ध असतात. त्यामुळे यात्रे दरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते.

यात्रे निमित्ताने ठाणे, वसई, पालघर, सुरत, वापी आदी भागातील मोठ्या प्रमाणात व्यापारी यात्रेत आपली दुकानें थाटत आहेत.यामध्ये शेतीची अवजारे, कांदा, लसूण, सुकी मच्छी, भांडी, चिकन, मटण, लहान मुलांची खेळणी, विविध खाद्य पदार्थ आदी ची दुकाने मोठ्या संख्येने असतात.

यात्रेत विविध करमणुकीची साधने, तसेच साहसी खेळ- यात्रेला लाखो भावीक येत असल्याने अनेक व्यापारी नागरिकांसाठी करमणूकीचे मोठ मोठे आकाश पाळणे, झूले, सर्कस, मौत का कुवा,सुनामी, कावड, ड्रेगन, फिरत पाळणा आदी प्रकार आहेत. यामध्ये मौत का कुवा तसेच आकाश चुंबी पाळणा यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आनंद घेत असतात.

देवीचे स्थान शिखरावर,मंदिर पायथ्याशी ?

देवीचे स्थान शिखरावर आहे. परंतु मंदिर पायथ्याशी कसे ? असा प्रश्न सर्वाना पडतो. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, पूर्वी एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्या वेळी दर्शनाला नियमाप्रमाणे शिखरावर जात असताना तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. तिला पुढे जाणे अशक्य झाले. आता देवीचे दर्शन घेता येणार नाही.

म्हणून तिने मातेची प्रार्थना केली. तिची प्रार्थना देवीने ऐकली. त्यावेळी दृष्टांतात देवीने तिला सांगितले की पायथ्यापाशी मी आहे. तेथे दर्शनाला ये. बेशुध्द होऊन पडलेली आदिवासी स्त्री खडबडून जागी झाली आणि पायथ्याजवळ येताच तिला महालक्ष्मी देवीने दर्शन दिले. पुढे या ठिकाणी मंदिर उभारले गेले.

डोंगराच्या सुळक्यावर ध्वज लावणे

डोंगराच्या सुळक्यावर झेंडा लावणे हे एक दिव्य समजले जाते. देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करणे व 1400 फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुध्द पौर्णिमेच्या मध्यरात्री केला जातो. हे काम वाघाडी येथील सातवी कुटुंब करीत आले आहेत. हा ध्वज घेऊन जाणारा पुजारी एक महिना मांस, मच्छी, दारू सेवन करीत नाही व ब्रम्हचर्य पाळतो. जव्हारच्या मुकणे राजघराण्याकडून अनेक वर्षापासून पाच मीटर लांब ध्वज, साडी, चोळी व पूजेचे साहित्य दिले जाते.

चैत्र शुध्द पौर्णिमेला मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी 12 नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो. त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारलेली असते. हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात. ध्वज लावण्याचे ठिकाण देवीच्या पूजेच्या डोंगरावरील स्थानापासून 600 फूट उंचावर आहे. तेथे अनेक वर्षापासून ज्याच्या अंगांत देवी संचारते तोच इसम चढतो.

रात्री 12 वाजता निघालेला पुजारी तीन मैल चढणीचा रस्ता कापून सुमारे 3 वाजता डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो आणि सकाळी 7 वाजता परत येतो. परंतु पायथ्याच्या मंदिरातून निघाल्या वेळेपासून परत येईपर्यंतच्या मधल्या काळात काय घडते हे स्वतः पुजारीही सांगू शकत नाही. ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो, तो सागाचा असून दर पाच वर्षांनी बदलावा लागतो.

या देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी दोनशे फूट भुयारातून जावे लागते. या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. येथील पाणी कधीच कमी होत नाही. या मंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण की, पेशवाईच्या काळात येथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली.

तिने मी मुसल्या डोंगरावर असल्याचे सांगितले. तेव्हापासून देवीच्या पूजेचे काम सातवी कुटुंबाकडे आहे. प्रतिवर्षी चैत्र शुध्द प्रतिपदेपासून सातवी कुटुंबातील नवीन पुजारी पुजेचे काम स्विकारतो. तो एक वर्ष पूजा सांभाळतो. आदिवासी या देवीला आपले कुलदैवत मानतात.

महालक्ष्मी देवीची यात्रा

महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्ण पक्षातील अष्टमीपर्यंत मंदिराच्या सभोवती असलेल्या मैदानात भरते. मंदिराच्या जवळून महामार्ग जात असल्यामुळे वस्ती वाढली आहे. सूरत, मुंबई मधील लाखो भाविक येथे येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक ध्वजस्तंभ असून त्यावर एक मोठा ध्वज फडकत असतो.

दसऱ्याला जुना ध्वज काढून त्याजागी नवीन ध्वज लावला जातो. यात्रेच्या वेळी ध्वजस्तंभाला बळी देऊन त्याची पूजा करतात. नंतर देवीची पूजा केली जाते. मंदिराच्या समोर दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये एक मुख्य होमकुंड आहे व दोन्ही बाजूला दोन होमकुंड आहेत. यात्रेमध्ये शेकडो दुकाने वेगवेगळ्या वस्तूंनी सजलेली असतात. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी सर्कस, जादूचे प्रयोग, असतात. यात्रेच्या निमित्ताने नवस फेडण्याच्या उद्देशाने, अनेकजण या ठिकाणी येत असतात.

भाद्रपद महिन्यात भात पिकल्यावर बारस हा दुसरा उत्सव साजरा केला जातो, आदिवासी शेतकरी बांधव नवीन पावसाने उगवलेले धान्य, भाज्या, प्राशन करत नाहीत. सर्वप्रथम महालक्ष्मी मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यावेळी गावांतील आदिवासी पारंपारिक वाद्य घेऊन भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी पायी चालत महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला येतात.

महालक्ष्मी डहाणूला कशी स्थायिक झाली ?

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली. वाटेने जाताना घनदाट जंगले, डोंगरदऱ्या पार करून गुजरातला जाणे सोपे नव्हते. राक्षसांशी गाठ केव्हा पडेल आणि कसा प्रसंग उद्भवेल याचा भरोसा नव्हता. एवढं सर्व माहीत असून सुध्दा महालक्ष्मी प्रवासास निघाली. महालक्ष्मीचा प्रवास ज्या परिसरातून होई तो भाग मंगल, पवित्र होत असे, विवळवेढे या गावाजवळील जंगलातून महालक्ष्मी जात असताना, त्या भागातील परिसरात बदल झाला. वातावरण पवित्र होऊ लागले.

त्याचा परिणाम म्हणून त्या भागातील राक्षसाला जाग आली. तो खडबडून उठला. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले. प्रवास करणाऱ्या महालक्ष्मीसमोर तो राक्षस उभा राहिला. शेवटी महालक्ष्मीने आपले खरे रूप प्रकट केले व राक्षसाला त्रिशूळाने ठार मारले. राक्षसाशी युध्द करून देवी दमली होती. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी योग्य जागा पाहू लागली.

तिची नजर जवळच्या डोंगरमाथ्यावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिला वाटले आणि महालक्ष्मी शिखरावर आली. निसर्गाच्या सानिध्यात देवीने राहावयाचे ठरविले. पुढे तिला एकटीला कंटाळा आला.

भक्तांची आवश्यकता वाटू लागल्याने येथील कान्हा ठाकूर नावाच्या माणसास देवीने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि आपली पूजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर रोज देवीची डोंगरावर जाऊन पूजा करू लागला आणि महालक्ष्मी डहाणूला स्थायिक झाली.

ऐतिहासिक नोंद: अकबर बादशहाच्या वेळी राजा तोरडमल येथे आला होता. त्याने देवीचे दर्शन घेतले होते. अशी इतिहासात नोंद आहे. तसेच पंजाबचा राजा रणजित सिंह याने पंजाब सर केल्यावर देवीची महापूजा करून मंदिरावर सोन्याचा कळस चढवला होता.

महालक्ष्मी मंदिरात साजरे केले जाणारे वार्षिक उत्सव- कोळीचा शेंदूर, पितर बारस, नव्याचा शेंदूर, नवरात्र उत्सव, दसरा, वाघ बारस, माही बारस, होळीचा शेंदूर, यात्रा उत्सव

महालक्ष्मी यात्रे पर्यंत कसे पोहचाल- मुंबई अहमदाबाद महामार्गालगत विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. डहाणूत रेल्वेने पोहचल्यास डहाणू बस आगारातून यात्रा स्पेशल बसेस असतात. तसेच तारपा चौक (सागर नाका) येथून रिक्षा सेवा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT