Forest Fire Pudhari
पालघर

Forest Fire: डहाणूतील विवळवेढेत डोंगर परिसरातील चोरबाव भागात वणवा; वनसंपत्तीचे मोठे नुकसान

युद्धपातळीवरील प्रयत्नांनी आग आटोक्यात

पुढारी वृत्तसेवा

डहाणू: डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) डोंगर परिसरातील चोरबाव भागात सोमवारी सायंकाळी अचानक वणवा लागल्याची घटना घडली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर प्रयत्न केल्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीत परिसरातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास चोरबाव परिसरात अचानक वणवा भडकला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग सतर्क झाला आणि तात्काळ पथके घटनास्थळी दाखल झाली.

कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर काही वेळात वणवा आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वनविभागाकडून तपास सुरू आहे.

दरवर्षीप्रमाणे मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळी महिन्यांत वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या आगीत अनेक झाडे, झुडपे, औषधी वनस्पती जळून खाक झाली असून वन्य प्राण्यांची निवासस्थानेही उद्ध्वस्त झाली आहेत.

या घटनेमुळे वन्य प्राणी अन्न व निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली असून गाव व शहर परिसरात त्यांच्या वावरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी केलेली कुंपणेही आगीत जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शासनासह स्थानिक ग्रामस्थांनी अधिक जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. वणवे रोखण्यासाठी जनजागृती, वेळेवर खबरदारी आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात येत आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिवसेंदिवस वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून,यामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे.

या घटनेमुळे वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांनी वणवा आटोक्यात आणण्यात यश मिळविले असून पुढील तपास सुरू आहे.
- सुजय कोळी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कासा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT