चवीपासून ते कमाईपर्यंत डहाणूच्या 'चिकू' चा देशात रुबाब pudhari photo
पालघर

Dahanu chiku: मेक्सिकोचा चिकू डहाणूला कसा पोहोचला?

how chikoo reach in palghar: दिल्ली ट्रेन बंद झाल्याने राजधानीचा मान हुकला; डहाणूचा चिकू महाराष्ट्राचा अभिमान; दिल्ली मात्र दूरच

पुढारी वृत्तसेवा

Dahanu chikoo history in marathi

पालघर : हनिफ शेख

पालघर जिल्ह्यातील डहाणू हे सागरी मासेमारी केंद्र, पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे चिकू, लिची, आंबा, नारळ, सफेद जाम आदी फळबागायती आहेत. शेती, पर्यटन आणि मासेमारी येथील मुख्य व्यवसाय आहे.33 किमी लांबीचा समुद्रकिनारा आणि पश्चिम घाटाच्या रांगा अशा निसर्गसंपन्नतेने डहाणू तालुका नटलेला आहे. येथील घोलवड हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिकूचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

मेक्सिकोचा चिकू डहाणूला कसा पोहोचला?

चिकू हे मूळचे मेक्सिको या देशातील आहे. 19 व्या शतकात कापड गिरणीचे मालक सर दिनशा मानेकजी पेटिट यांनी 1896 सालात मुंबई येथील त्यांच्या गार्डनमध्ये चिकुचे झाड लावले होते. त्यानंतर 1901 मध्ये त्यांचा इस्टेट मॅनेजर अर्देशिर इराणी यांनी मुंबईपासून 160 किमी दूर असलेल्या घोलवड गावात चिकूच्या बिया लावल्या आणि हे फळ इथल्या मातीत रुजवले. येथील कॅल्शियम गुणधर्मयुक्तजमीन, उष्ण व दमट हवामान या पिकाला चांगले मानवले. वैशिष्ट्यपूर्ण स्वाद, सुगंध आणि पौष्टिक गुणांनीयुक्त असल्यामुळे येथील चिकू जगप्रसिद्ध झाला.

कोसबाड संस्थेतील आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. जयवंतराव पाटील यांनी विविध कलम पद्धती विकसित करून चिकुची कलमे बनवली. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागवडीसाठी दिल्याने पंचक्रोशीत चिकूच्या बागा निर्माण झाल्या.

पालघरमध्ये चिकूची लागवड किती?

आजमितीस डहाणूत दहा हजार एकर तर संपूर्ण जिल्ह्यात साडेबारा एकर क्षेत्रावर चीकुची लागवड आहे. चिकूच्या कालिपत्ती, पिलिपत्ती, क्रिकेट बॉल, छत्री अशा विविध जाती विकसित झाल्या असून त्यापैकी कालीपत्ती जातीचे चिकू या भागात चांगले वाढतात. येथील बागायतदारांना या झाडांचे व्यवस्थापन तंत्र आत्मसात झाल्याने वेळेवर खत, पाणी, छाटणी व फळांची काढणी केली जाते.

चिकूच्या झाडाला किती वर्षांनी फळ येतात?

चिकू कलमांची लागवड केल्यानंतर 5 वर्षानंतर उत्पादनास सुरुवात होते. 20 वर्षे वयाच्या चिकूच्या झाडापासून वार्षिक 1500 ते 2000 फळे मिळतात.

चिकूच्या झाडावरुन फळे कशी काढतात?

फळे काढण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधव बेडणीचा(झेला) वापर करतात. या फळांना काढणीनंतर पाण्याच्या हौदात धुतली जातात. ही फळे धुण्याची विशिष्ट पद्धत स्थानिक पातळीवर वापरली जाते. त्यासाठी खताचे रिकामी पोते स्वच्छ धुतल्यानंतर, त्याची एकेक बाजू दोघे जण धरतात, झोळीसारख्या खोलगट भागात फळे व पाणी घेऊन हलवले जाते.

त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या फळांची प्रतवारी करून पॅकिंग गोणी किंवा बांबू पासून बनविलेल्या करंड्यात (टोपली) केली जाते. हल्ली करंड्याऐवजी पुठ्याचे बॉक्स वापरले जातात. त्यामुळे बुरुड काम करणाऱ्या घोलवड, बोर्डी, चिखले, मसोली येथील महिलांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.

बागायतीतून चिकू संकलन केंद्रापर्यंत फळे घेऊन जाण्यासाठी रेडे किंवा बैलगाडीचा वापर केला जायचा. हल्ली ट्रॅक्टर, टेंम्पो, पिकअप इ. वाहनांचा वापर होतो. काही चिकू बागायतदारांनी चिकू संकलन केंद्रांची स्थापना करून व्यापार क्षेत्रात उतरल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो.

2016 साली येथील चिकुला घोलवड डहाणू भौगोलिक मानांकन प्राप्त होऊन जागतिक बाजारपेठेत ओळख मिळाली. कोव्हीड परिस्थितीत लॉकडाऊन लागल्यानंतर फळांची निर्यात ठप्प झाली होती. याच काळात भारतीय रेल्वे मंत्रालयाने डहाणू रोड ते दिल्ली दरम्यान जानेवारी 2021 रोजी किसान रेल सेवा चिकू निर्यातीसाठी बागायतदारांना उपलब्ध करून दिली.

उत्तर भारतातल्या विविध राज्यात चिकुला अधिक मागणी असून दरही चांगला मिळतो. चिकू फळांना कमी भाव मिळतो तेव्हा चिकु फळांपासून चिकू चिप्स, चिकू पावडर, लोणचे, चिकू जॅम, असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून नफा मिळवला जातो. त्यातूनच चिकू पार्लर उभी राहत आहेत. शारदा पाटील या महिलेने पंचवीस वर्षांपूर्वी चिकू फळांपासून 140 प्रकारचे प्रक्रिया पदार्थ बनवले, अन्य महिलांना पाककला तंत्र शिकवले. विविध महिला बचतगट हे पदार्थ बनवत असून, ते देशभर प्रसिद्ध आहेत.

बोर्डीलगत बोरीगाव येथे श्रीकांत सावे आणि त्यांची कन्या प्रियंका सावे या बाप-लेकीने चीकु फळांपासून वाईन बनविण्याचा उद्योग 2016 साली स्थापन केला. ही जगातील पहिली चिकू वायनरी तर प्रियंका यांना वाईनलेडी म्हणून ओळख मिळाली आहे. पर्यटन महामंडळ नोंदणीकृत 18 कृषि पर्यटन केंद्र तालुक्यात विकसित झाली असून रोजगानिर्मिती होत आहे.

बोर्डी चिकू महोत्सव आणि डहाणू महोत्सवाच्या आयोजना वेळी चिकू सफारी ही संकल्पना पूढे आली. त्याद्वारे पर्यटकांना चिकू बागायतींमध्ये भटकंतीचा आनंद लुटता येतो. यावेळी कलम लागवड, फळे तोडणी, प्रक्रिया पदार्थांची चव चाखण्यासह स्थानिक लोकसंस्कृतीची माहिती दिली जाते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे असून चिकू लागवड, चिकू मुल्यवर्धन पीक संरक्षण आदि विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.

बाग ते विक्री अंतर जलद होणे काळाची गरज

डहाणू तालुक्यातील घोलवड या भागात चिकूची उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते सध्या चिकूचा भाव 25 ते 30 तर काही प्रमाणात त्याच्या आकारावरून देखील हा भाऊ ठरवला जातो. गावरान चिकू आकाराने छोटे असतात यामध्ये एका किलोमध्ये आठ ते 25 आणि 30 नगापर्यंत ही चिकू बसू शकतात चिकूचा सीजन जानेवारी ते मे आणि त्यानंतर थंडीच्या दिवसातही असतो मात्र गावरान चिकू चवीला गोड असतो.

अनेक महाराष्ट्रातील फळांना लवकर बाजारपेठ मिळावी यासाठी 2020 मध्ये किसान रेल्वे चालू केली होती ही नाशिक देवळाली मार्गे पुढे जात असल्याने फळ आणि भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा यामुळे मिळत होता कारण की या फळांची आणि भाज्यांची तोडणी ते विक्री ही जलद होणे आवश्यक आहे.

मात्र सध्या किसान रेल्वे ही शेतकऱ्यांच्या कमी प्रतिसादामुळे आणि वाढीव खर्च झाल्याने बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुरुवातीला या प्रवासासाठी सबसिडी देण्यात येत होती ती बंद झाल्याने देखील शेतकऱ्यांनी स्वस्त मार्गाने वाहतूक होईल अशा वाहनांचा उपयोग केल्याने याला प्रतिसाद कमी मिळाला आणि त्यातूनच ही रेल्वे बंद झाल्याचे प्रथमदरनी दिसून येत आहे. मात्र आज देखीलही रेल्वे चालू व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

  • (1888)डहाणू आणि घोलवड परिसराची हवा चिकूसाठी अत्यंत पोषक आहे.1888 मध्ये या भागात पारशी बांधवांनी चिकूची लागवड सुरू केली.डहाणूचे रहिवासी मेहरवान खोदादद इराणी यांनी चिकूच्या झाडांना रायन वृक्षावर कलम करण्याची पद्धत शोधून काढली, ज्यामुळे येथील चिकूच्या मुळांना मजबूती मिळाली आणि उत्पादनात क्रांती झाली.

  • भौगोलिक मानांकन डहाणू-घोलवडचा चिकू इतर भागातील चिकूंपेक्षा वजनाने जड असतो आणि त्यात 2 ते 3 बिया असतात.येथील चिकूच्या गोडव्यामुळे आणि अद्वितीय चवीमुळे याला शासनाकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे

  • अर्थकारण आणि प्रक्रिया उद्योग डहाणू-बोरदी पट्ट्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे चिकूच्या बागांवर अवलंबून आहे. येथे दरवर्षी 400 ते 500 टनांपेक्षा जास्त चिकूचे उत्पादन होते. नाशिवंत फळ असल्यामुळे आता येथे चिकू प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आली आहेत.यामुळे चिकूपासून पावडर, चिप्स, वाइन, जॅम आणि पेढे यांसारखे मूल्यवर्धित पदार्थ बनवून शेतकऱ्यांचा नफा वाढवला जात आहे.

  • कृषी पर्यटन डहाणू-बोरदीचा भाग हा अप्रतिम चिकूच्या बागांसाठी ओळखला जातो. येथे अनेक पर्यटक चिकू ट्रेल वॉक आणि फार्म सफारीचा आनंद घेण्यासाठी येतात. मुंबईपासून केवळ 150 किमी अंतरावर असल्याने वीकेंडला फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.डहाणूच्या चिकूची ही यशकथा केवळ फळ उत्पादनापुरती मर्यादित नसून, ती इथल्या स्थानिकांची संस्कृती आणि वारली आदिवासींच्या रोजगाराचा मुख्य स्त्रोत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT