डहाणू: गुजरातहून डहाणूकडे येणाऱ्या एका भरधाव कारचा सोमवारी सकाळी डहाणू शहरातील सरावली परिसरात भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक गुरे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित कुटुंबीय गुजरातहून डहाणूमधील नातेवाईकांच्या भेटीसाठी येत होते. दरम्यान, डहाणू-चारोटी राज्य मार्गावरील सरावली येथील कल्पदीप रुग्णालयाजवळ त्यांच्या कारसमोर अचानक गुरे आली.
गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात वाहनातील पाचही प्रवासी जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी कल्पदीप रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.