डहाणू : डहाणू तालुक्यातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी येणारी केळी कोणत्या पद्धतीने पिकवली जातात, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. डहाणू शहर, आशागड, गंजाड, चारोटी, कासा आणि सायवन परिसरात मोठ्या प्रमाणात केळी विकली जातात. डझनाला ५० ते ७० रुपये मोजूनही ग्राहकांना केळींच्या गुणवत्तेची खात्री मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने डहाणू शहरासह ग्रामीण भागातील केळी पिकवण्याच्या वखारींसह प्रमुख बाजारपेठांची अचानक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. नवरात्रोत्सवातील उपवास, धार्मिक कार्यक्रम आणि दैनंदिन आहारात केळींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
बाजारपेठांमध्ये कच्ची केळी आणून ती पिकवून विकली जातात. मात्र, ती पिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, याची माहिती ग्राहकांना नसते. केळीचा रंग पिवळा आणि फळ दिसायला चांगले असले, तरी ते सुरक्षित असल्याची खात्री केवळ बाह्य स्वरूपावरून देता येत नाही. त्यामुळे केळी विक्रेते, घाऊक व्यापारी, साठवणूक केंद्रे आणि वखारींची तपासणी करणे आवश्यक आहे.
अन्नसुरक्षा नियमांनुसार, कॅल्शियम कार्बाइड वापरून फळे पिकवण्यास बंदी आहे. त्यामुळे केळी पिकवताना प्रतिबंधित पदार्थांचा वापर होतो का, हे तपासणीतून स्पष्ट होणे गरजेचे आहे. अधिकृत तपासणी आणि आवश्यक प्रयोगशाळा चाचण्यांद्वारे वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा आहे. अन्न व औषध प्रशासनाने डहाणूत तपासणी मोहीम राबवून केळी पिकवण्याची पद्धत, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तुर्भेतील कारवाईनंतर डहाणूतील केळी बाजारपेठांच्या तपासणीची होतेय मागणी
नवी मुंबईतील तुर्भे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात ५ ऑक्टोबर रोजी एफडीएने छापा टाकून १,३९४ किलो केळी जप्त केली. केळी इथेफॉन या रसायनाच्या द्रावणात बुडवून पिकवली जात असल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील केळी पिकवण्याच्या वखारी आणि बाजारपेठांचीही ने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
केळी पिकवण्याच्या पद्धतीबाबत संशयास्पद बाबी आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी. तपासणीत नियमबाह्य पद्धतीचा वापर आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पालघर