Palghar Ashram School pudhari photo
पालघर

Palghar Ashram School : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

उर्से (म्हसाड) येथे मुलांना चढवले पाण्याच्या टाकीवर; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर!

पुढारी वृत्तसेवा

कासा : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, त्यांच्याच सुरक्षिततेबाबत आश्रमशाळांमध्ये गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यातील उर्से(म्हसाड) येथे समोर आला आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील तीन ते चार विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीवर चढवून साफसफाई तसेच टाकी भरण्याचे काम करून घेतल्याचा प्रकार १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला.

विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या या घटनेमुळे आश्रमशाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुख्याध्यापक व अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील सुखट आंबा येथे पाण्याच्या टाकीशी संबंधित दुर्घटनेत दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अद्याप ताजी असतानाच उर्से येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनाच टाकीवर चढवून काम करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पालक व ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाण्याच्या टाकीची स्वच्छता व देखभाल ही शाळा प्रशासनाने संबंधित कर्मचारी किंवा प्रशिक्षित व्यक्तींकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करून करून घेणे अपेक्षित असताना, विद्यार्थ्यांना अशा धोकादायक कामासाठी टाकीवर का चढवण्यात आले? त्यांना हे काम करण्यास कोणी सांगितले? शाळेतील जबाबदार कर्मचारी त्यावेळी कुठे होते? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात आली होती? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.या घटनेबाबत शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्याकडे विचारणा केली असता, माहिती देण्याचे टाळले.

इंग्रजी विषयाचे अध्यापन नियमित नसल्याची तक्रार

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेबाबतही तक्रारी समोर येत आहेत. माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन नियमितपणे होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शाळेच्या मुख्यध्यापक यांच्याकडे इंग्रजी हा विषय असून ते वेळेवर आणि पुरेसे अध्यापन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या तक्रारी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांपर्यंत पोहोचूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालक व विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

उर्से आश्रम शाळेमधील काही विद्यार्थी शाळेतील पाण्याच्या टाकीवर चढले असल्याचे माहिती मिळाली असून त्याबाबत प्रकल्प कार्यालय डहाणू येथील चौकशी कमिटी यांनी शाळेला भेट दिली असून त्याबबाबत चा अहवाल अप्पर आयुक्त ठाणे यांना पाठवण्यात येईल, त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पुढील दोषी शिक्षक आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
सिद्धार्थ राजकुमार, प्रभारी प्रकल्प अधिकारी डहाणू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT