कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी कडू पाडा येथील १७ वर्षीय मुलीचा बऱ्हाणपूर येथील चिंचपाडा परिसरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या मृत्यूबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने कासा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ ते ७.४५ वाजण्याच्या दरम्यान बऱ्हाणपूर येथील चिंचपाडा परिसरात ही घटना घडली. मुलगी ही एका परिचित मुलाच्या घरी असताना बाथरूम मध्ये जात असताना पाय घसरून खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
दुखापत झाल्यानंतर मुलीली उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
सध्या या माहितीच्या आधारे कासा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ९६/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कासा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील इतर बाबींवरून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाची नोंद कासा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय पाठक तपास करीत आहेत. इनक्वेस्टची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक राजीव चौधरी यांनी केली आहे.
कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून, पोलिसांच्या तपासातून मुलीचा मृत्यू नेमका अपघाती होता की अन्य काही कारणामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.
कासा पोलिसांकडून चौकशी सुरू
मुलीच्या मृत्यूबाबत कुटुंबीकडून व नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खबर देणाऱ्याने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मृत मुलीचे वडील यांना या घटणेबाबत विचारणा केली असता बऱ्हाणपूर चिंचपाडा येथील मुलीचा प्रियकर तिला त्यांच्या घरी कुटूंबाला न सांगता घेऊन गेला तसेच तिच्या मोबाईलवर संपर्क केला असता फोन बंद करून ठेवल्याचे वडिलांनी सांगितले. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मुलीच्या नातेवाईकांकडून तिच्या कुटूंबाना माहिती देण्यात आली, तसेच तिचा मृत्यू हा संशयास्पद झाला असल्याचा आरोप मृत मुलीच्या वडीलांनी केला असून, याबाबत आम्हाला न्याय मिळावा असं पुढारीशी बोलताना सांगितले.