खोडाळा ः राज्यामध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी होवून पुरपरिस्थिती उद्भवली होती, त्यामुळे काही भागात शेतक-यांचे शेती पिकांची व शेत जमीनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.त्यामुळे शासन निर्णयानुसार पालघर जिल्हयातील पालघर डहाणू, तलासरी, विक्रमगड तालुक्यामधील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्याबाबत निर्णय झालेला आहे. 4 तालुके वगळता जिल्हयातील वाडा, वसई, मोखाडा व जव्हार या तालुक्यात पिक कर्ज वसुलीसाठी कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.
एकीकडे जिल्ह्यातील 4 तालुक्यांना सवलत देत शासनाने उर्वरित 4 तालुक्यांना सापत्न भावाची वागणूक दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.पिक कर्ज माफीच्या आशेवर असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज वसूलीचा तगादा लागणार असल्याने आधिच नुकसानी मूळे गर्भगळीत झालेला बळीराजा धास्तावला आहे.
पालघर जिल्ह्यात निसर्गाने समान भावाने अतिवृष्टी केली आहे. त्याच पटीत शेतकऱ्यांचे नुकसानही केले आहे. यात वसई, वाडा,जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झालेले आहे. काढणीला आलेल्या पिकाला अतिवृष्टीमुळे शेतातच पुन्हा धुमारे फुटले तर काढून ठेवलेले पिकं शेतातच कुजून गेले आहेत. बहूतांश पिकं तर अक्षरशः समूळ धुवून नेले आहेत. निसर्गाने लहरीपणाचा उच्छाद मांडतांना जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात दुजा भाव केला नाही.परंतू पिक कर्ज वसूलीत सवलत देतांना माय बाप सरकार मात्र सापत्न भावाची वागणूक देत आहे.शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही बिकट झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील सवलती पासून वंचित राहिलेल्या मोखाडा तालुक्यात 3 हजार 578 शेतकऱ्यांकडे 16 कोटी 45 लक्ष 70 हजार, जव्हार तालुक्यातील 1 हजार 823 शेतकऱ्यांकडे 11 कोटी 96 लक्ष 87 हजार , वाडा तालुक्यातील 2 हजार 155 शेतकऱ्यांकडे सर्वाधिक 30 कोटी 93 लक्ष 15 हजार तर वसई तालुक्यातील 534 शेतकऱ्यांकडे 1 कोटी 99 लक्ष 12 हजार असे एकूण 8 हजार नव्वद थकबाकीदार शेतकऱ्यांकडून तब्बल 61 कोटी 89 लक्ष 84 हजार रुपये थकबाकी आहे.ही थकबाकी वसूल करण्याचे सहकारी बँके समोर मोठे आव्हान असून माफीच्या प्रतिक्षेत असलेल्या परंतु सवलतही न मिळालेल्या शेतकऱ्यांसमोर जाताना वसूली अधिकाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जात मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.
महाराष्ट्रात 2025 मधील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित 34 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून, राज्य सरकारने अल्पमुदतीच्या पीक कर्जाच्या वसुलीस 1 वर्ष स्थगिती दिली आहे. 10 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार, बाधित 347 तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण करून कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली असली तरी पालघर जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा,वाडा आणि वसई तालुक्यातील हजारो शेतकरी सवलतीस पारखे राहिल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून विरोधी पक्षही याबाबत मुग गिळून बसलेले असल्याने आम्ही कोणाकडे दाद मागायची असा आर्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
थकीत कर्ज वसुली बाबत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धोरण जाणून घेण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाशी संपर्क साधला असता कर्ज वसूली करण्यात येत असल्याची माहिती प्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
याबाबत राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाने शेतकऱ्यांच्या हिताची भुमिका घेतली असून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिशा ठरविण्यात येईल असे सुतोवाच माजी तालुकाध्यक्ष दिलीप जागले आणि विद्यमान कार्याध्यक्ष अनंता झुगरे यांनी केले आहे.
अतिवृष्टीमुळे आमचे शेत जमीनीचे आणि पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. पिक कर्ज वसूलीत आम्हालाही सवलत मिळावी.तुकाराम भागा पेहेरे, शेतकरी.