डहाणू : डहाणू तालुक्यातील सरावली परिसरात अंधश्रद्धा आणि करणीच्या संशयातून शेजारी राहणाऱ्या दांपत्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या पतीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरावली येथील पाटीलपाडा परिसरात राहणारा विलास अर्जुन नामकोडा याची पत्नी वारंवार आजारी पडत होती. काही दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यानंतर शेजारी राहणारे सुरेश हरजी भरकुड आणि त्यांची पत्नी गुलाब सुरेश भरकुड हे करणी करत असल्याचा संशय आरोपीच्या मनात निर्माण झाला होता. याच संशयातून बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान विलास नामकोडा याने सुरेश भरकुड आणि गुलाब भरकुड यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यात सुरेश भरकुड आणि गुलाब भरकुड हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी दोघांनाही तातडीने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गुजरातमधील रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारा दरम्यान गुलाब भरकुड यांचा मृत्यू झाला. तर सुरेश भरकुड यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी विलास नामकोडा याने विषप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यालाही उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी फिर्यादी अविनाश विक्या गुजर यांच्या तक्रारीवरून डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धा आणि करणीच्या संशयातून घडलेल्या या हिंसक घटनेची परिसरात सर्वत्र चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.