वाडा : वाडा तालुक्यातील पिंपळास गावात शाळा, दवाखाना, क्रीडांगण तसेच अन्य सार्वजनिक विकासकामांच्या उभारणीसाठी वन विभागाकडे रीतसर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळण्याच्या आधीच काही लोकांनी अवैध पद्धतीने वनक्षेत्रातील जागांचा ताबा घेऊन त्यावरील सुमारे 25 हजार झाडांची कत्तल केली आहे. आश्चर्य म्हणजे याच जागेत घरकुलांची देखील उभारणी करण्यात आली असून नियमांना तिलांजली देण्यात आली आहे असा आरोप करून कम्युनिस्ट पक्षाने गुरुवारपासून पिंपळास ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पिंपळास गावाच्या हद्दीत वन विभागाच्या जागेत काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून यात वृक्षांची मोठी कत्तल करण्यात आली आहे. शासनाकडून मिळालेल्या घरकुल योजनेच्या अनुदानाचा गैरवापर करून, कोणतेही शासकीय निकष न पाळता, जिओ टॅगिंग केलेल्या जागेव्यतिरिक्त वन विभागाच्या जागेत बेकायदेशीर घरकुले बांधण्याचा प्रयत्न केला आहे असे आंदोलक सांगतात. ग्रामपंचायत प्रशासन व गटविकास अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून शासकीय निधीचा अपहार झाला आहे असा आरोप करण्यात येत आहे.
पिंपळास गावातील नदीकाठी एका व्यावसायिकाने बांधकाम नियमांचे उल्लंघन करून नदीपात्र अडवून, ग्रामपंचायतीच्या आशिर्वादाने अनधिकृत बांधकाम केले आहे. याव्यतिरिक्त गावातील एका रोजगारसेवकाची अरेरावी वाढली असून लोकांची कामे अडवून त्यांना नाहक त्रास दिला जातो असा आरोप आहे.
वन विभागाच्या जागेत केलेली ही बांधकामे निष्कासित करावी, नदीकाठी झालेले अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करावी तसेच ग्रामसभेने ठरविल्या प्रमाणे मुजोर रोजगार सेवकांच्या जागी नवीन रोजगारसेवक नेमण्यात यावा, अवैध प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशा मागण्यांसाठी हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.