Borivali Virar railway project pudhari photo
पालघर

Borivali Virar railway project : बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका 30 टक्के पूर्ण

२,१८४ कोटींच्या प्रकल्पाला वेग; २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

विरार : मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील बोरीवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्पाने अखेर वेग घेतला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे ३० टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या प्रकल्पाचे काम २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तब्बल २ हजार १८४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.

बोरिवली ते विरार हा २६ किमीचा रेल्वे पट्टा असून, या मार्गावर सध्या उपनगरीय लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक एकाच मार्गिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याबरोबरच विलंबाची साखळी निर्माण होते. पाचवी आणि सहावी मार्गिका स्वतंत्रपणे उपलब्ध झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलची वाहतूक वेगळी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्यासह वेळापत्रक अधिक सुरळीत करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा बोरिवलीनंतरच्या मीरा रोड, भाईंदर, नायगाव, नालासोपारा, वसई रोड व विरार परिसरातील लाखो प्रवाशांना होणार आहे. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे एका गाडीला झालेल्या विलंबाचा परिणाम इतर गाड्यांवर कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी रेल्वे संरचनांचे स्थलांतर आणि स्थानकांवरील बदलांची कामे सुरू आहेत. दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, नालासोपारा आणि वसई रोड परिसरातील रेल्वे संरचनांशी संबंधित कामे पूर्ण झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. दहिसर, भाईंदर आणि विरार येथील फलाटांच्या रचनेतही बदल करण्यात येणार आहेत. या बदलांमुळे नव्या मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि विविध वैधानिक परवान ग्यांनाही मोठे महत्त्व आहे. वसईतील उमेलमान परिसरातील सुमारे ११.९२९ हेक्टर मिठागर जमिनीचा ताबा मिळाला असून उर्वरित जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. वन आणि कांदळवनाशी संबंधित आवश्यक परवानग्याही मिळाल्या आहेत. त्यामुळे जमीन आणि पर्याव रणाशी संबंधित अडथळे दूर करत प्रकल्पाचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, नायगाव-पांजू बेट परिसरातील रेल्वे पूल क्रमांक ७५ ते पांजू बेट या भागात सुमारे १ लाख ३० हजार घनमीटर मातीचे काम पूर्ण झाले आहे. अन्य एका कामाच्या टप्प्यात सुमारे ७० हजार घनमीटर मातीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाच्या कामालाही वेग आल्याचे दिसून येत आहे.

वसई-विरारची लोकसंख्या आणि रेल्वेवरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असताना विद्यमान रेल्वे मार्गावरील क्षमतेवर मोठा ताण आहे. त्यामुळे पाचवी-सहावी मार्गिका हा केवळ नवीन रेल्वे मार्गाचा प्रकल्प नसून संपूर्ण पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढविणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे.

२०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण झाल्यास वसई-विरार परिसरातील प्रवाशांना अधिक नियमित, वेळेत व तुलनेने सुकर रेल्वे प्रवासाची अपेक्षा आहे. मात्र, प्रकल्पाचे उर्वरित ७० टक्के काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास कामाचा वेग कायम ठेवणे रेल्वे प्रशा-सनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पासाठी २,१८४ कोटी खर्च मंजूर केला आहे. वसई उमेलमान येथे ११.९२९ हे. मिठागराच्या जमिनीचा ताबा मिळाला असून, वन, कांदळवन विभागाची मंजुरीही मिळाली आहे. डहाणू, मीरा रोड, भाईंदर, आदी स्थानकांवर रेल्वेच्या रचनेत बदल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT