

ठाणे : नवी मुंबई विमानतळ आता पूर्ण क्षमतेने सुरू होत असून या विमानतळाला जोडणारे विविध शहरांकडील रस्ते आता विकसित केले जाणार आहेत. यामध्ये ठाणे ते नवी मुंबई विमानतळ येथील उन्नत मार्गाचाही समावेश आहे. पुढील वर्षभरात हा मार्ग कार्यरत होईल.
सध्या ठाण्यावरून नवी मुंबईत जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीला सामना करावा लागतो. विशेषत: तुर्भे, नेरूळ या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी असते. त्यामुळे झटपट प्रवासासाठी ठाणे उन्नत मार्ग होणार आहे. तसेच अटल सेतू ही विमानतळापर्यंत विस्तारित होणार आहे. ठाणे बोरिवली संजय गांधी उद्यान बोगद्यामुळे उत्तर मुंबई ही विमानतळाला जोडली जाईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ठाणे आणि मुंबईला थेट जोडण्यासाठी सिडकोने विविध वाहतूक प्रकल्पांचे नियोजन केले आहे. ठाणे ते नवी मुंबई विमानतळादरम्यान सीमलेस उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशी थेट मेट्रो मार्गिका तसेच बेलापूर ते सागर संगम आणि पेंधर ते विमानतळ अशा दोन मेट्रो मार्गिकाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोने महापालिकेला सादर केले असून, हे प्रस्ताव आगामी महासभेत माहितीसाठी मांडले जाणार आहेत.
बेलापूर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे ठाण्यावरून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यास सध्या दीड तास लागतो. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि वाहनांची संख्या वाढणार असल्याने या मार्गांवरील वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याकडून विमानतळापर्यंत थेट आणि वेगवान जोडणी निर्माण करण्यासाठी उन्नत मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
ठाण्यातील कोपरी, पटणी रस्त्यापासून सुरू होऊन खाडीच्या किनाऱ्याने हा मार्ग पुढे जाणार आहे. ऐरोली खाडी पुलाशी जोडली जाणारी ही मार्गिका कोपरखैरणे, वाशी खाडी पूल, पाम बीच मार्ग, सानपाडा, नेरुळ आणि बेलापूरमार्गे नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे आणि विमानतळादरम्यानच्या प्रवासासाठी विद्यमान प्रमुख मार्गांना पर्याय उपलब्ध होईल.
राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला १२ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे. प्रकल्पाच्या सुधारित खर्चास १८ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली असून, केंद्र सरकारच्या व्यवहार्यता तफावत निधीसाठी प्रस्ताव आर्थिक व्यवहार विभागाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन विमानतळांना मेट्रोने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावही सिडकोने मांडला आहे.
मेट्रो मार्गिका ८ ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी असेल. ३४.८९ किमी मार्गावर वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ सेक्टर-१, नेरुळ सेक्टर-१०, सीवूड्स, बेलापूर आणि सागर संगम अशी स्थानके प्रस्तावित आहेत. ही मार्गिका विमानतळाच्या टर्मिनल-२ पर्यंत असेल. याशिवाय बेलापूर ते सागर संगमदरम्यान ३.०२ किमी मेट्रो मार्गिका १ए प्रस्तावित आहे. या मार्गावर सागर संगम आणि सेक्टर-१५ अशी दोन स्थानके असतील. पेंधर ते नवी मुंबई विमानतळाच्या पूर्वेकडील टर्मिनल-४पर्यंतची मेट्रो मार्गिका २ ही १४.०७ किलोमीटरची असून, ११ स्थानके प्रस्तावित आहेत.
वाहतूक नियोजनाचे आव्हान
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भविष्यात वार्षिक सुमारे ९ कोटी प्रवाशांची ये-जा अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या प्रवासी संख्येसाठी विमानतळापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केवळ विद्यमान रस्त्यांवर अवलंबून ठेवणे शक्य होणार नाही. ठाणे-बेलापूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग ४८वरील सध्याची गर्दी लक्षात घेता विमानतळाच्या कार्यान्वयनानंतर वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे उन्नत मार्गिका आणि मेट्रोच्या माध्यमातून विमानतळासाठी पर्यायी तसेच सार्वजनिक वाहतुकीचे सक्षम जाळे उभारणे ही भविष्यातील वाहतूक नियोजनातील महत्त्वाची गरज ठरणार आहे.
नवी मुंबई विमानतळाशी मुख शहरांची केवळ एका दिशेने जोडणी करण्याऐवजी ठाणे, मुंबई व नवी मुंबई या तिन्ही भागांतून रस्ता, मेट्रो अशा दोन्ही माध्यमांतून जोडणी निर्माण करण्याचे नियोजन आहे. विमानतळावर भविष्यात वार्षिक ९ कोटी प्रवाशांची ये-जा अपेक्षित असल्याने ही पर्यायी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. विमानतळाच्या विकासाबरोबरच त्याला पूरक वाहतूक जाळे उभारण्याच्या दृष्टीने सिडकोचे हे प्रस्ताव महत्त्वाचे मानले जात आहेत.