संदीप जाधव
बोईसर : पावसाळा सुरू होताच बोईसर-चिल्हार रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने चक्क रस्त्यातील खड्ड्यात बसून आंघोळ करत अनोखे आंदोलन केले, ज्यामुळे या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी नागझरी नाका परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात बसून बादलीने आंघोळ केली. त्यांच्या या कृतीने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर चिमटा घेतला आहे. या अनेख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गरजे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले आहे की, "रस्त्यांच्या कामांमध्ये उघडपणे भ्रष्टाचार होतो. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ते काही दिवसांतच उखडतात. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो आणि करदात्यांचा पैसा पाण्यात जातो, असा थेट आरोप केला आहे. त्यांनी विशेषतः एमआयडीसी अधिकाऱ्यांवर निशाणा साधत म्हटले आहे की, अधिकारी केवळ कागदोपत्री काम दाखवून वेळ मारून नेत आहेत. त्यांचे लक्ष वेधण्यासाठीच आम्हाला आज खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे".
या आंदोलनानंतर, रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून प्रवाशांना दिलासा द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.