बोईसर एमआयडीसी परिसरातील रस्ते रुंदीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल  pudhari photo
पालघर

Boisar MIDC tree cutting : बोईसर एमआयडीसी परिसरातील रस्ते रुंदीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल

दुभाजके बकाल, नव्या लागवडीचा मागमूस नाही, वृक्षप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

पुढारी वृत्तसेवा

बोईसर ः बोईसर एमआयडीसी ते चिल्हार मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत असून लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाला अक्षरशः खिळ बसली आहे. रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली; मात्र त्यानंतर नव्याने वृक्षलागवड व देखभाल पूर्णपणे बेपत्ता असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एमआयडीसी प्रशासनाकडून मागील दोन वर्षांमध्ये बोईसरमधील मुख्य मार्गांवर दुभाजक उभारून त्यावर सुशोभीत वृक्षलागवड करण्यात आली होती. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, योग्य देखभाल व पाणीपुरवठ्याअभावी बहुतांश ठिकाणी ही झाडे कोमेजून नष्ट झाली असून अनेक ठिकाणी केवळ कोरड्या काड्या उरल्या आहेत. सध्या अनेक दुभाजकांचे ब्लॉक विस्कळीत अवस्थेत पडून असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

काही ठिकाणी दुभाजकांचे काम अर्धवट अवस्थेत असून रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाऐवजी विद्रूप चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, बोईसर-चिल्हार रस्ता रुंदीकरणावेळी शेकडो मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. पर्यावरण संतुलनासाठी त्याऐवजी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात एकही वृक्ष वाढल्याचे चित्र दिसून येत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र नियोजनाचा अभाव व देखभाल नसल्यामुळे हा पैसा वाया जात आहे. दुभाजकांवर पुन्हा रंगरंगोटी करून तात्पुरता देखावा निर्माण केला जात असला तरी मूळ समस्या कायम आहे. तसेच, रस्त्यांच्या सिमेंटीकरण डांबरीकरणनंतर अल्पावधीतच विविध कामांसाठी पुन्हा खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.

यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने तातडीने दुभाजकांची दुरुस्ती करून योग्य वृक्षलागवड व देखभाल करावी, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व वृक्षप्रेमींकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT