Boisar CNG Supply Pudhari
पालघर

Boisar CNG Supply: पालघरमध्ये सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम; तासंतास प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे वाहनचालकांचे हाल

दरम्यान गुजरात गॅस कंपनीने दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे सांगत दिवसभरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील मुख्य सीएनजी स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामाचा परिणाम पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पुरवठ्यावर झाला असून अनेक सीएनजी केंद्रांवर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून बोईसर शहरातील काही सीएनजी स्टेशनवर एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.दरम्यान गुजरात गॅस कंपनीने दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे सांगत दिवसभरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती दिली आहे.

सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य व्यावसायिक वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी प्रवासी वाहतूक सेवेवरही परिणाम झाला असून अनेक चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

वाढत्या उन्हात आणि गर्दीत वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बोईसर येथील मुख्य सीएनजी स्टेशनवरून बोईसर परिसरातील तीन सीएनजी केंद्रांसह पालघर तालुक्यातील पारगाव, बोट, वाडा-खडकोना, पालघर शहर, वाडा तालुक्यातील पाली फाटा व वाडा, डहाणू तालुक्यातील चारोटी, विक्रमगड, जव्हार तसेच भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा येथील सीएनजी स्टेशनना गॅसचा पुरवठा केला जातो.

त्यामुळे मुख्य केंद्रातील दुरुस्तीचा थेट परिणाम या सर्व भागांतील सीएनजी उपलब्धतेवर झाला. गुजरात गॅस कंपनीमार्फत पालघर आणि ठाणे ग्रामीण भागातील एकूण 37 सीएनजी स्टेशनना गॅस पुरवठा केला जातो. यापैकी 28 स्टेशन पालघर जिल्ह्यात तर 9 स्टेशन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत.

मुख्य पुरवठा केंद्रातील अडचणीमुळे या विस्तृत नेटवर्कमधील अनेक केंद्रांवर सीएनजीची कमतरता जाणवली.दरम्यान, गुजरात गॅस कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार बोईसर येथील मुख्य सीएनजी स्टेशनवरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून गॅस पुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे दिवसभरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सीएनजी तुटवड्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता भविष्यात अशा प्रकारच्या दुरुस्तीच्या कामांदरम्यान पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT