बोईसर: बोईसर-चिल्हार रस्त्यावरील गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील दोन बंगला परिसरात शनिवारी सायंकाळी ट्रेलरमधून सुमारे १५ ते २० टन वजनाची लोखंडी कॉइल भररस्त्यात कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने कॉइल कोसळली त्यावेळी तिच्या शेजारून अन्य कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा अपघात टळला आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा बोईसर-चिल्हार रस्त्यावरून होणाऱ्या अवजड कॉइल वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एवढ्या वजनाच्या कॉइलची वाहतूक करताना योग्य पद्धतीने बांधणी व सुरक्षितता उपाय केले जातात का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कॉइल झाकण्यासाठी ताडपत्रीचा वापर करण्यात आल्याचे दिसत असले तरी, एवढ्या प्रचंड वजनाच्या कॉइलला वाहतुकीदरम्यान सुरक्षितपणे स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
१५ ते २० टन वजनाची कॉइल रस्त्यावर कोसळणे ही किरकोळ घटना नाही. अशा प्रकारची कॉइल एखाद्या दुचाकीस्वारावर, चारचाकीवर किंवा पादचाऱ्यावर कोसळली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शनिवारी झालेल्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही. कॉइल रस्त्यावर कोसळल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती रस्त्यावर कोसळूच नये यासाठी वाहतूक यंत्रणेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आणखी एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
यापूर्वीही घडल्या घटना
बोईसर-चिल्हार मार्गावर यापूर्वीदेखील वाहतूक सुरू असताना कॉइल खाली पडल्याच्या तसेच अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये छोटे-मोठे अपघातही झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असूनही कॉइल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल केला जात आहे.