मोखाडा : घटस्थापनेच्या नऊ दिवसांच्या काळात देवीचे भक्त गरबा नृत्य अथवा इतर नृत्य प्रकार सादर करण्यासाठी अनेक आधुनिक वाद्यांच्या तालावर ठेका धरतात. परंतू आजही आदिवासी गाव पाड्यांमध्ये भोंडवाई (चार पाच महिला किंवा एक मुलींचा ग्रुप तयार करून एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन पारंपरिक गाणी किंवा टिपरी नाच करुन धान्य अथवा पैसे स्वरूपात बिदागी घेतात ही पिढीजात परंपरा आजही ग्रामीण भागातील मुली, महिलांनी जतन करून ठेवली आहे.
नवरात्रीच्या काळातील गरबा हा नृत्यप्रकार गुजरात, राज्यस्थान येथील संस्कृतीचे दर्शन घडवतो या नृत्यावर ठेका धरायला डीजे, डॉल्बी, बॅन्ड पथकाच्या कर्कश आवाजाच्या तालावर शहरी भागातील तरुण मंडळी ठेका धरते परंतु आजही नवरात्री उत्सवाच्या काळात जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील आदिवासी तरुणी भोंडवाई गीताच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
पालघर जिल्ह्यात अनेक जमातीचे आदिवासी बांधव राहत असून प्रत्येक जमातीच्या सण उत्सवाचा चे वेगळेपण आपल्याला पहायला मिळते. ग्रामीण भागातील भोंडवाई नऊ दिवस गावा गावात गाणं किंवा टिपरी नृत्य करण्यास दाखल होतात नृत्यात लहान मुलांपासून वयस्कर स्त्रिया सुद्धा उत्साहाने सहभागी होतात त्यांच्या हातात दोन टिपऱ्या आणि केसात रानफुले लावलेली असतात भाँडवाईची गाणे किंवा नृत्य सादर करुन झाल्यावर नाचणी, तांदूळ अथवा पैशाच्या स्वरूपात बिदागी दिली जाते. भोंडवाईच्या परिक्षेसाठी टोपल्याखाली वस्तू झांकून ठेवली जाते व ती वस्तू तिला ओळखायची असते तर नऊ दिवस गावा गावात जाऊन भोंडवाईतून मिळालेल्या धान्यांचा नवव्या दिवशी दुर्गा मातेला नैवेद्य दिला जातो.
शहरातील देवीच्या मंदिरात तसेच चौक, मोकळ्या जागेत देवीची मूर्ती विराजमान करुन घटस्थापना केली जाते. परंतू ग्रामीण भागात मात्र सर्व आदिवासी कुटुंबे आप आपल्या कुलदैवताचा पसारा पाडून ( प्रतिष्ठापना) करून नऊ दिवस कुलदैवताची मनोभावे पूजा अर्चा केली जात आहे.