विक्रमगड (पालघर) : सचिन भोईर
मोबाईल व चायनीज खेळण्याच्या दुनियेत रमलेल्या मुलांना पारंपरिक खेळण्याचा पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळेच उटावली येथील बांबू पासून वस्तू बनविणाऱ्या कलाकारांनी लाकडी खेळण्यांवर विशेष लक्ष दिले आहे. रेल्वे इंजिन, बदक, गाडी आशा विविध खेळण्यांसोबत पूर्णपणे नैसर्गिक व बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील, फुलदाण्या व अन्य ३५ प्रकारच्या वस्तू मन मोहून टाकतात.
उटावली गावात नैसर्गिक वस्तू निर्मिती बांबू हस्तकला महिला समूह नावाने महिला व परुष अशा ३० जणांचा एक समूह सध्या बांबू कलेत रमलेला आहे. अतिशय सुबक व बारीक काम, उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील, बांबूपासून बनविलेली पाणीबॉटल, चहाकप, मोबाईल स्टॅन्ड, फुलदाणी, बॉल, मोबाईल स्पीकर स्टॅन्ड, फूड स्टॅन्ड, तारपा शोपीस अशा विविध ३५ प्रकारच्या वस्तू येथे आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या वस्तू पारंपरिक हत्यारांच्या साह्याने बनविले जात असले तरी येत्या काळात आधुनिक हत्यारे व यंत्र वापरून या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याचा मानस आहे.
मेस बांबू, मानवेर बांबू आणि कासट अशा तीन जातींचा उत्तम बांबू या वस्तूंसाठी नैसर्गिक प्रक्रिया करून वापरला जातो. वेगवेगळ्या पद्धतीच्या आकाश कंदिलांची ४०० ते ८०० पर्यंत किंमत असून या ठिकाणी ६० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत विविध वस्तू मिळतात. बांबूचे फर्निचर देखील तयार करून दिले जात आहे.
केशव सृष्टी सस्थन प्रशिक्षण देऊन आम्हाला कलेचा मार्ग दाखवला असून आता आम्ही पूर्ण ताकतीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करीत आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात सुबक व वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवून गरुडझेप नक्कीच घेवू.रेश्मा महाले, अध्यक्ष, बांबू हस्तकला समूह