खानिवडे : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 51 गरीब जोडप्यांचे सामूहिक विवाह बंधन करून समाजसेवेचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले गेले आहे. जूचंद्राच्या शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने हा 51 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून रविवार दि.25 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता हिंदू वैदिक पद्धतीने आदिवासी बहुल प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा माण, विक्रमगड येथे संपन्न होणार आहे. यासाठी वसईतील योगीपुरुष परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
त्यामध्ये या मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भव्य दिव्य बर्थडे पार्टी आयोजित न करता त्या ऐवजी मुलांच्या लग्नाची चिंता सतावणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यासाठी हा 51 जोडप्यांच्या विवाह सोहळा आयोजित करून समाजापुढे समाजसेवेचे एक वेगळे उदाहरण ठेवले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या या आयोजनाचे आता कौतुक करण्यात येत आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहिदास पाटील (संस्थापक शंकर नारायण महाविद्यालय भाईंदर), बाळाराम पाटील (अध्यक्ष रयत शिक्षण संस्था रायगड विभाग), निलेश सांबरे (अध्यक्ष आदिवासी सेवा मंडळ मुंबई), राजेशभाई त्रिवेदी (अध्यक्ष मैत्री फाऊंडेशन), विजयशेठ पाटील (उद्योजक व माजी सभापती जि.प.ठाणे), प्रदीप मारोतराव खैरकर (उपाध्यक्ष आदिवासी सेवा मंडळ), गुरुनाथ भोईर (अध्यक्ष बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम), महेश नाईक (सचिव आदिवासी सेवा मंडळ), यशवंत वातास सर (अध्यक्ष आदिवासी शैक्षणिक सेवा), रमेश माळी (मुख्याध्यापक आश्रम शाळा माण, विक्रमगड) तसेच शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पुरुषोत्तम पाटील यांचे हितचिंतक उपस्थित राहणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात संसारासाठी घरातील सर्वच सदस्यांना कमाईसाठी बाहेर पडावे लागत आहे. तरीही कुटुंबाच्या गरजा पुऱ्या होत नाही. अशी अनेक कुटुंबे पालघर जिल्ह्यात आपले जीवन व्यतीत करत असताना घरात उपवर झालेल्या मुलामुलींच्या विवाह पार करताना त्या कुटुंबांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. एकीकडे भव्य आणि राजेशाही विवाह सोहळे तर दुसरीकडे आई बापाला पोरांच्या विशेषतः मुलींच्या लग्नाची चिंता असे असलेले चित्र पाहत आलेल्या शिव छत्रपती समाज सेवा मंडळाकडून सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येतात.