वाडा : वाडा तालुक्यामध्ये सिमेंट बंधारे व काँक्रिट रस्त्यांच्या बोगस कामांचा जणू महापूर आला असून कंत्राटदार व अधिकारी पुरामध्ये हातपाय धुऊन घेत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जाळे गावात लघुपाटबंधारे विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या एका सिमेंट बंधाऱ्याची कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे अशाच प्रकारे दयनीय अवस्था झाली आहे. सिमेंट काँक्रीटच्या या बंधाऱ्यामध्ये चक्क दगडांचा भरणा केल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलखोल केली असून याबाबत कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
जाळे गावातील एका ओहोळावर सिमेंटचा मोठा बंधारा बांधण्याचे काम कंत्राटदाराकडून हाती घेण्यात आले असून लघुपाटबंधारे विभागामार्फत जवळपास 24 लाखांचा निधी यासाठी मंजूर असल्याची माहिती आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे या बंधाऱ्यात चक्क दगडांचा भरणा केला जात असून वापरले जाणारे लोखंड अंदाजपत्रकानुसार नाही असा आरोप केला जात आहे. स्थानिक युवा कार्यकर्ते यतिष गोरे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून काँक्रीटमध्ये दगड भरल्याचे पुरावे दिले आहेत.
पाण्याचा योग्य साठा व्हावा यासाठी काम अंदाजपत्रकानुसार होणे गरजेचे आहे मात्र कंत्राटदाराने आपल्या फायद्यासाठी नियमांना पायदळी तुडविल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी अधिकारी या कामाकडे ढुंकून बघत नसल्याने कंत्राटदार मनात येईल तसे काम रेटून नेत आहे असेही त्यांनी सांगितले.
तातडीने या कामाची चौकशी करून बोगस काम निष्कासित करून अंदाजपत्रकानुसार काम करून घ्यावे अशी गोरे यांची मागणी आहे. उप अभियंता अजित जाधव यांना संपर्क केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
या प्रकरणी स्थानिकांची तक्रार प्राप्त होताच लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर पाहणी करून चौकशी केली नोटीस देऊन काम बंद करण्याच्या सूचना केल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितले.
वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असणारा हा खेळखंडोबा अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे शक्य होतो, अधिकारी कार्यालयात बसून विकासकामांकडे डोकेझाक करतात ज्यात कंत्राटदार आपले उखळ पांढरे करतात, जाळे गावातील बंधाऱ्याची पाहणी करून दगड भरल्याचे पुरावे मिळविले असून याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी.यतीश गोरे, युवा सामाजिक कार्यकर्ते, खैरे- आंबिवली