पालघर ः मनोर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून मुंबई अहमदाबाद महामार्गालगत उभारण्यात येत असलेले दोनशे खाटांचे सामान्य आणि वीस खाटांच्या ट्रामा केअर रुग्णालयाची गेल्या सहा वर्षांपासून रखडपट्टी सुरु आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने कामाचा वेग संथ झाला आहे. रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले आहे. सुरुवातीला 76 कोटी रुपयांचा खर्च गेल्या सहा वर्षात 120 कोटी रुपयांपर्यत पोहोचला आहे.
रुग्णालयाच्या इमारती व्यतिरिक्त रुग्णांसाठी खाटा, ऑक्सीजन पाईपलाइन,फर्निचर,विद्युतीकरण आणि अग्निशमन यंत्रणेच्या कामांचा समावेश नव्हता, सुधारित 120 कोटी रुपयांच्या रकमेला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु कामे सुरु होण्यासाठी उशीर झाला. दरम्यान नवीन वर्षातील मार्च महिन्यापर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून इमारती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली. रुग्णालयाच्या इमारती आरोग्य विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर कर्मचारी भरती प्रक्रिया आणि अन्य शासकीय सोपस्कार पार पाडून ट्रामा केअर रुग्णालयातून उपचार सुरु होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात उपचाराच्या सुविधा नसल्याने रुग्णांना गुजरात आणि सिल्वासा तेथील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. अत्यवस्थ रुग्ण आणि गरोदर महिलांचा गुजरात राज्यातील रुग्णालयात पोहचण्या आधीच प्रवासात मृत्यूच्या घटना घडत असल्याने रुग्णांना ट्रामा केअर रुग्णालय सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टाकवहाल गावाच्या हद्दीत सामान्य रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरच्या दोन इमारती उभ्या झाल्या आहेत. परंतु मूळ आराखड्यात फर्निचर,लिफ्ट,अग्निशमन यंत्रणा, ऑक्सिजन पाइपलाइन,पाणीपुरवठा योजना आणि इलेक्ट्रिफिकेशनच्या कामांचा समावेश नसल्याने सुधारित मान्यता घेण्यात आली. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया आणि कार्यादेश आदी सोपस्कार पार पाडून रुग्णालयाच्या अंतर्गत कामे सुरु व्हायला उशिर झाला. आदिवासी बहुल जिल्हा निर्माण होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु जिल्ह्यात आरोग्य,दळणवळण आणि नागरी सुविधांचा विकास दृष्टिपथात नाही. जिल्हा निर्मिती नंतरही आरोग्य सुविधांच्या बाबतीत मुंबईला लागून असताना पालघर जिल्हा मागासलेलाच राहिला आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन,राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे.
2017 मध्ये मनोर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून दोनशे खाटांचे सामान्य आणि वीस खाटांचे ट्रामा सेंटर उभारण्यासाठी 76 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर 2019 मध्ये रुग्णालयाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. रुग्णालय मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत टेन ग्रामपंचायत हद्दीतील टाकवहाल गावच्या हद्दीत सिमला इन हॉटेल समोरच्या शासकीय जागा निश्चित करण्यात आली होती.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांमध्ये गंभीर जखमी प्रवाशी आणि वाहन चालकांवर उपचाराची व्यवस्था असलेले रुग्णालय उपलब्ध नाही. त्यामुळे जखमींना उपचारासाठी मुंबई, गुजरात किंवा केंद्र शासित प्रदेश सिल्वासा येथे न्यावे लागते. लांबचा प्रवास असल्याने रुग्णालयात पोहोचे पर्यंत उशीर होऊन वाटेतच जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.अपघातात गंभीर जखमींना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महामार्गालगत दोनशे खाटांचे सेंटर उभारण्याची संकल्पना समोर आली होती. ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक असताना दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भाव काळात निधीच्या अडचणींमुळे रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू होते.परंतु कोरोंना नंतरही कामाची संथगतीने कायम होती.
ट्रामा केअर सेंटरच्या दोन्ही इमारतींचे बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले आहे.विद्युतीकरणाचे काम 60 ते 70 टक्क्यां पर्यंत पूर्ण झाले असुन लिफ्ट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.निधी उपलब्ध नसल्याने कामांना उशीर होत आहे, निधी उपलब्ध झाल्यानंतर कामांना गती मिळणार आहे.