दैनिक पुढारी वर्धापनदिनानिमित्त कोकण सन्मान सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील माहीम येथील आदर्श सरपंच प्रीती अरुण पाटील तसेच केळवे दसरमाळ येथील आदर्श सरपंच संदीप भगवान किणी यांच्या कार्याची दखल घेत आज (28 फेब्रु.) रोजी सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
गुणवत्तापूर्ण विद्यार्थी जीवनातून समाजसेवेचा मंत्र आत्मसात करून ग्रामविकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून माहीम येथील सरपंच प्रीती अरुण पाटील यांची ओळख संपूर्ण पालघर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी प्रशासनात विविध सुधारणा घडवून आणल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधत गावासाठी अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प राबविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.
शैक्षणिकदृष्ट्या बीएससीपर्यंत शिक्षण पूर्ण करताना त्या बहुआयामी व गुणवंत विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, मेहेंदी, क्रीडा आणि बातमी लेखन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी राज्यस्तरीय यश मिळवले. पुढे पदवी शिक्षणानंतर शिक्षिका म्हणून काम करत शिक्षण क्षेत्रातही योगदान दिले. गेल्या 18 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात क्लासेस चालवत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून च्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि स्वच्छता मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मागील दोन वर्षांत ग्रामपंचायत माध्यमातून रस्ते विकासाला प्राधान्य देत विविध निधी योजनांमधून जवळपास 15 किलोमीटर रस्ते कामे पूर्ण किंवा प्रगतीपथावर आहेत. औद्योगिक भागातील प्रलंबित रस्त्यांची कामेही सुरू करण्यात आली आहेत. तसेच शासन मंजूर 200 घरकुलांचे काम योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीस चालना देण्यात येत आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून सरपंच प्रीती पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.