पालघर ः उत्पादन शुल्क विभागाचा डहाणू विभाग व भरारी पथकाने जव्हार नाशिक रस्त्यावरील साकी हॉटेल समोर संयुक्तपणे केलेल्या कारवाईत केंद्र शासित दादरा नगर हवेली, दमण व दिव मध्ये विक्रीसाठी असलेले परराज्यातील मद्य साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईत तब्बल 37 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दमण बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याच्या गोपनीय माहिती नुसार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जव्हार शहरातील जव्हारनाशिक रस्त्यावर साकी हॉटेलसमोर सापळा रचला होता.दरम्यान पहाटेच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयास्पद टेम्पोचा पाठलाग करून थांबवत टेम्पोची तपासणी केली.
यावेळी टेम्पो मध्ये परराज्यातील मद्याचा साठा आढळून आला. टेम्पो मधील 215 बॉक्स मधील दारू साठा जप्त करण्यात आले.यात 1373.76 बल्क लिटर विदेशी दारू तसेच 672 बल्क लिटर बिअरचा समावेश आहे.