वारकऱ्यांसाठी आता पेन्शन योजना Pudhari File Photo
महाराष्ट्र

Warkari Pension Benefits| वारकऱ्यांसाठी आता पेन्शन योजना

वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी आदेश जारी

पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी व सुविधा पुरविण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. या महामंडळाबाबतचा आदेश रविवारी जारी करण्यात आला.

राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी यांनी केली होती. रविवारी या योजनेचा आदेश जारी करण्यात आला. या महामंडळामार्फत वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

तसेच विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. या महामंडळाला ५० कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे.

  1. महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात ५० कोटी रुपयांचे भागभांडवल देणार

  2. वारकऱ्यांसाठी पवित्र असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास

  3. कीर्तनकार व वारकऱ्यांना वैद्यकीय मदत, विमा कवच

महामंडळाच्या महत्त्वाच्या प्रस्तावित योजना

  • राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.

  • सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.

  • आषाढी-कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देणे. वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्याकरिता (टाळ, मृदंग, विणा, इ.) अनुदान. कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबविणार आषाढी-कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देणार.

  • पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्त्य ऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास करणे.

  • चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करणे. परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कार्यवाही करणे.

  • श्री क्षेत्र पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये काँक्रिटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे, त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. या जागेव्यतिरिक्त पालख्या, वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी, फडांसाठी तसेच त्यांच्या सोयी-सुविधांसाठी कार्यवाही करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT