नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सत्तांतरानंतर शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पोलिस दलातही बदल्यांचे वारे वाहत आहेत. काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा पोलिस दलात आहे.
राज्यात भाजपने शिंदे गटासोबत युती करीत सत्ता स्थापन केल्यापासून विविध शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. पोलिस दलातही बदल्यांबाबत चर्चा सुरु असून गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर या चर्चांना जोर वाढला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार कार्यकाळ पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाहिजे असलेल्या ठिकाणी पोस्टींग मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक आयुक्तालयातील पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, विजय खरात आणि पौर्णिमा चौगुले हे २०१९ पासून सध्याच्या पदावर नियुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ जवळपास पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचप्रमाणे पोलिस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षकांच्याही बदल्या होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवानंतर गृह विभागाने त्यासंदर्भात हालचाली सुरू केल्याचे समजते. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सप्टेंबर २०२० पासून पदभार स्विकारला असून गतवर्षी त्यांची बदली झाल्याने त्यांनी न्यायालयामार्फत बदलीस स्थगिती मिळवली होती. दरम्यान, बदल्यांमध्ये अपेक्षीत ठिकाण व पद मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरु केले असून भेटीगाठी, संदर्भ देत मनासारखी बदली करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
पोलिस उपआयुक्त अमोल तांबे आणि संजय बारकुंड यांना जानेवारी महिन्यात भारतीय पोलिस सेवेत पदोन्नती मिळाली. त्यापैकी तांबे यांचा कार्यकाळ पुर्ण झाला असून तांबे यांच्यासह पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची बदलीची शक्यता आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यात इतर ठिकाणी पोस्टींग साठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शिवाय, इतर अधिकाऱ्यांनीही इच्छित स्थळी व पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जात आहे.