उत्तर महाराष्ट्र

नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव काळात नागरिकांकडून ऑनलाइन खरेदी व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक होण्याचा धोका असल्याने सायबर पोलिसांनी हा प्रबोधनात्मक सल्ला दिला आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-व्यवहार वाढल्यास गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असतात. त्याचप्रमाणे व्यावसायिकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलत देत असतात. त्यामुळे ग्राहकही जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार करतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हे शाखेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त वसंत मोरे, सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी ऑनलाइन गस्त वाढविली आहे. तर, दुसरीकडे या कालावधीत गणेशोत्सवात मंडळे, निवासी सोसायटी, विविध क्लबसहित शाळा-महाविद्यालये, संस्थांमध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पोलिसांकडून त्यासाठी नियोजन होत असून, प्रबोधनासाठी इच्छुक संस्थांनाही पोलिसांशी संपर्क साधता येणार असून त्यासाठी 0253-2305226 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

.. अशा प्रकारे होऊ शकते ऑनलाइन फसवणूक
भारतीय सैन्यात नोकरीस असल्याचे भासवून बदली झाल्याने स्वस्तात वाहन किमती चीजवस्तू विक्री करण्याचे सांगत खरेदीदाराची फसवणूक होते. बिल न भरल्याने वीजजोडणी खंडित करण्याचा इशारा देऊन, विविध अ‍ॅप लोनच्या माध्यमातून माहिती चोरून भरमसाट व्याज वसूल करणे, क्लोन अ‍ॅपमार्फत मोबाइलचा ताबा घेऊन भामटे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करतात. उत्सव काळात अनोळखी व्यक्तीशी ई-व्यवहार टाळावेत, असेही आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT