उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वीस दिवसांनंतरही शहर काँग्रेस पोरकीच ; आहेर यांच्या राजीनाम्यानंतर मिळेना नवीन शहराध्यक्ष

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर यांनी शिर्डी येथील चिंतन शिबिरात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला होता. आहेर यांनी राजीनामा देऊन 20 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही काँग्रेसला नवीन शहराध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे शहर काँग्रेस पालकापासून पोरकेच राहिले आहे.

नाशिक शहराध्यक्षपदाची धुरा सात वर्षांपेक्षा जास्त काळ आहेर यांच्या हाती होती. 'एक पद, एक व्यक्ती' या संकल्पनेनुसार आहेर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर इच्छुकांनी पुन्हा सक्रिय होत गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू केली आहे. आगामी काळात मनपा निवडणुका होणार असल्याने इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठीकडे भेटीगाठी वाढल्या आहेत. शहराध्यक्षपदासाठी गुरुमित बग्गा, राहुल दिवे, डॉ. हेमलता पाटील, भारत टाकेकर, डॉ. शोभा बच्छाव, शैलेश कुटे, विजय राऊत, राजेंद्र बागूल आदींची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, पदाधिकारी निवडीसाठी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्षांच्या निवडीसाठी जुलै महिना उजडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सेवा दल शहराध्यक्षांचा राजीनामा
नाशिक काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी सोमवारी (दि.20) आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष विलास अवतडे यांच्याकडे पाठविला आहे. त्यात इतर पदाधिकार्‍यांना संधी मिळण्यासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीमुळे डॉ. ठाकूर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

तालुकाध्यक्षांची उद्या निवड
काँग्रेस पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मंगळवार (दि.22) पर्यंत तालुकाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. तर 25 जूनपर्यंत नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT