उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महात्मा गांधी रोडवर गुलमोहर कोसळला; दुचाकींसह दुकानांचे नुकसान

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महात्मा गांधी रोडवरील वकीलवाडी कॉर्नरजवळ गुरुवारी (दि. 23) दुपारी 3.45च्या सुमारास गुलमोहराचा वृक्ष उन्मळून पडला. वृक्षाखाली सापडल्याने तीन ते चार दुचाकींसह काही दुकानांचे नुकसान झाले. शहरातील एमजी रोड, वकीलवाडी परिसरातील बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. त्यामुळे या परिसरातील वाहनतळांमध्येही वाहने मोठ्या प्रमाणात असतात. गुरुवारी दुपारी वृक्ष कोसळला तेव्हा त्या परिसरात नागरिकांची वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गुलमोहराचा बुंधा जमिनीपासून अचानक उन्मळून संपूर्ण वृक्ष खोडासह पडला. यावेळी वृक्षाच्या बुंध्याखाली दुचाकी वाहने दबली गेली, तर परिसरातील मोबाइल विक्री करणार्‍या दुकानांबाहेरील बाजूचे किरकोळ प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहोचले. लीडिंग फायरमन इक्बाल शेख, राजू नाकिल, शिवाजी फुगट, हेमंत बेळगावकर, भीमाशंकर खोडे आदींनी कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्ता रहदारीसाठी खुला केला.

यावेळी परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. काही दिवसांपूर्वी गुलमोहर वृक्ष कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आजच्या घटनेने पुन्हा असुरक्षित वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT